राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा , महाराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राने केरळला 37-07 असे नमवीत वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता महाराष्ट्राची गाठ हरियाणा व उत्तर प्रदेश यांच्यातील विजेत्या संघाबरोबर होईल.

अयोध्या-उत्तर प्रदेश येथील डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय बंदिस्त क्रीडा संकुलातील मॅटवर झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राने सुरुवातच जोरदार केली. महाराष्ट्राने 9व्या मिनिटाला सिद्धार्थ देसाईनेने शिलकी दोन गडी टिपत केरळवर पहिला लोण देत 13-04 अशी आघाडी घेतली. पुन्हा 12व्या मिनिटाला पंकज मोहितेने सुपर रेड करीत शिलकी 3 गडी टिपत केरळवर दुसरा लोण देत 22-04 अशी आपली आघाडी भक्कम केली. पुन्हा 19व्या मिनिटाला महाराष्ट्राने तिसरा लोण देत 33-04 अशी आघाडी वाढवीत केरळच्या गोठातील हवा काढून घेतली. याच गुणफलकावर मध्यांतर झाला.

विश्रांतीनंतर महाराष्ट्राने सिद्धार्थ देसाई व रिशांक देवाडिगाला विश्रांती दिली. पण उत्तरार्धात काही मिनिटांनी केरळने आपली हार मान्य करीत माघार घेतली. सिद्धार्थ देसाई, पंकज मोहिते यांच्या लक्षवेधक चढाया त्याला गिरीश इरनाक, शुभम शिंदे यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ त्यामुळे हा मोठा विजय शक्य झाला.

इतर सामन्यात रेल्वेने उत्तरांचलला (30-15); चंदीगडने गोव्याला (45-27); कर्नाटकने दिल्लीला (54-37); राजस्थानने बिहारला 39-33; हिमाचलने छत्तीसगडला (43-23); सेनादलने तामिळनाडूला (54-24) असे पराभूत करीत आगेकूच केली.

याअगोदर झालेल्या साखळी लढतीतून खालील संघ बाद फेरीत दाखल झाले.

अ गट – भारतीय रेल्वे – केरळ
ब गट – सेनादल – दिल्ली
क गट – राजस्थान – हिमाचल प्रदेश
ड गट – उत्तर प्रदेश – चंदीगड
इ गट – गोवा – हरियाणा
फ गट – छत्तीसगड – बिहार
ग गट – कर्नाटक – तामीळनाडू