
महाराष्ट्राने ‘ह’ गटात मणिपूरचा 49-30 असा सहज पराभव करीत वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय स्पर्धेत विजयी सलामी दिली. अजिंक्य पवार, पंकज मोहिते, गिरीश इरनाक व शुभम शिंदे यांच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर महाराष्ट्राने दमदार विजय मिळवला हे विशेष.
महाराष्ट्राने सातव्या मिनिटाला पंकज मोहितेने केलेल्या चढाईत शिलकी दोन गडी टिपत मणिपूरवर पहिला लोण दिला आणि 11-03 अशी आघाडी घेतली. 11 व्या मिनिटाला दुसरा लोण देत ही आघाडी 20-03 अशी वाढवत नेली. यानंतर महाराष्ट्राच्या संघात शिथिलता आली. मणिपूरवर तिसरा लोण देता देता रिशांकच्या दोन वेळा अव्वल पकडी झाल्या. मध्यंतराला महाराष्ट्राकडे 31-16 अशी आघाडी होती.
मध्यंतरानंतर हीच शिथिलता महाराष्ट्राच्या अंगाशी आली असती. यावेळी मणिपूरने खेळात आक्रमता आणत महाराष्ट्रावर लोण देत आणला. पण शिलकी दोन खेळाडूंत महाराष्ट्राने पकड करीत पंकजला जीवदान दिले. त्याने व अजिंक्यने चढाईत, तर गिरीश इरनाकने पकडीत गुण घेत 10 व्या मिनिटाला मणिपूरवर लोण पलटवला. यात मोक्याच्या क्षणी गिरीशने केलेल्या पकडी महत्त्वाच्या ठरल्या. या लोणमुळेच महाराष्ट्राने आपला विजय निश्चित केला. या विजयात अजिंक्य पवार, पंकज मोहिते यांच्या चढाया आणि गिरीश इरनाक, शुभम शिंदे यांच्या पकडी महत्त्वपूर्ण ठरल्या.
इतर सामन्यांत राजस्थानने पूर्वार्धातील 13-22 अशी पिछाडी भरून काढत चुरशीच्या लढतीत हिमाचल प्रदेशचा 34-31 असा निसटता पराभव करीत आगेकूच केली. दुसऱया एका अटीतटीच्या सामन्यात कर्नाटकने तामीळनाडूला 35-32 असे चकवीत साखळीत पहिल्या विजयाची नोंद केली. दक्षिणेकडील या दोन्ही संघाच्या लढतीत विश्रांतीला 17-16 अशी नाममात्र आघाडी तामीळनाडूकडे होती.



























































