
वैवाहिक वादातून पतीने पत्नीवर वार करत तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हत्येनंतर आरोपीने फेसबुक लाईव्ह करत गुन्ह्याची कबुली दिली. शालिनी असे मयत पत्नीचे नाव आहे. पतीने स्वतःच पोलीस ठाणे गाठत गुन्ह्याची माहिती दिली. याप्रकरणी मुलाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
केरळमधील कोल्लम येथील वलक्कोडू येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. इसहाक असे आरोपी पतीचे नाव आहे. शालिनी आणि इसहाक यांच्यात वाद होते. याच वादातून सोमवारी सकाळी शालिनी अंघोळीसाठी जात असतानाच इसहाकने तिच्यावर चाकूने वार केले. यात तिचा मृत्यू झाला.
पत्नीची हत्या केल्यानंतर इसहाकने आधी फेसबुक लाईव्हवर मग पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ घरी दाखल होत पाहिले असता शालिनी मृतावस्थेत आढळली. शालिनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी दोघांचेही मोबाईल फोन जप्त केले आहेत. फॉरेन्सिक टीम घटनास्थळाची तपासणी करत आहे.