नवी मुंबई मेट्रो विमानतळापर्यंत धावणार, लाईन एक ए, दोनच्या विस्ताराला शासनाची मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई मेट्रोच्या विस्तारास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे नवी मुंबई मेट्रो आता आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत धावणार आहे. मंजुरी मिळालेल्या मेट्रो लाईन एक ए आणि मेट्रो लाईन दोनचे काम पुढील वर्षी सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही मेट्रो मार्गांमुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहोचणे प्रवाशांना सोपे होणार आहे.

नोव्हेंबर २०२३ मध्ये नवी मुंबई मेट्रो लाईन एक यशस्वीरीत्या सुरू झाल्यानंतर सिडकोने मेट्रो विस्ताराच्या पुढील टप्प्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो महाराष्ट्र शासनाकडे सादर केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुविधा समितीच्या बैठकीत नवी मुंबई मेट्रोच्या विस्तारास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार सीबीडी बेलापूर ते सागर संगमदरम्यान मेट्रो लाईन एक ए हा ३.०२ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग तयार करण्यात येणार आहे. या मार्गाला प्रस्तावित गोल्ड लाईन मेट्रो मार्गाशी आंतरजोडणी देण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या पश्चिम भागातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत अखंड आणि सुलभप्रवास शक्य होणार आहे.

मेट्रो लाईन दोन ही पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-४ यादरम्यान ११ स्थानकांसह विकसित करण्यात येणार आहे. हा मार्ग विमानतळ परिसरात विकसित होत असलेल्या क्षेत्रांना तसेच एमआयडीसी भागाला महत्त्वपूर्ण सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

एमएमआरडीएतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या कल्याण-तळोजा मेट्रो लाईन १२ या मार्गावर तळोजा येथील अमनदूत स्थानकावर मेट्रो लाईन दोनची आंतरजोडणी देण्यात येणार आहे.

या दोन्ही प्रकल्पांवर सुमारे ५ हजार ५७५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मेट्रो लाईन एक ए आणि दोनचे काम या प्रकल्पाचे बांधकाम आर्थिक वर्ष २०२७-२८ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.

जागतिक दर्जाची वाहतूक व्यवस्था

नवी मुंबई मेट्रो लाईन एक ए आणि लाईन दोनला मिळालेली मंजुरी ही नवी मुंबईसाठी जागतिक दर्जाची, एकात्मिक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या सिडकोच्या दृष्टिकोनातील महत्त्वाचा टप्पा आहे. मेट्रो मार्गामुळे निवासी, व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्राचा संपर्क अधिक सक्षम होणार आहे. अशी प्रतिक्रिया सिडकोचे एमडी विजय सिंघल यांनी दिली आहे.