हनुमानचालिसा पठणाचा दिखावा भोवला,राणा दाम्पत्याला कोर्टाचा झटका; दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठणाचा दिखावा करणाऱ्या राणा दाम्पत्याला मंगळवारी विशेष सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी दोषमुक्ततेसाठी केलेला अर्ज फेटाळला. तसेच 5 जानेवारीला आरोपनिश्चिती केली जाणार असून त्यावेळी दोघांनाही हजर राहण्याचे सक्त आदेश दिले.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात राणा दाम्पत्याने ‘मातोश्री’ बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठणाचा दिखावा केला होता. त्या कृत्यातून सामाजिक सौहार्द बिघडवल्याच्या आरोपाखाली खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. या गुह्यात दोषमुक्त करण्याची विनंती राणा दाम्पत्याने केली होती. पोलिसांनी फौजदारी दंड संहितेच्या कलम 149 अन्वये बजावली होती. त्या नोटिसीचे पालन केले होते. त्यानंतर ती नोटीस मागे घेण्यात आली होती. त्यामुळे पुढील कारवाई करण्याचा प्रश्न उरत नाही, असा दावा राणा दाम्पत्याने केला होता. तथापि, हा दावा अमान्य करीत न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राणा दाम्पत्याचा अर्ज मंगळवारी फेटाळला. याचवेळी खटला चालवण्याची कार्यवाही सुरू करीत दोघांना 5 जानेवारीला हजर राहण्याचे सक्त आदेश दिले. त्यामुळे राणा दाम्पत्याला मोठा झटका बसला आहे.

नवनीत राणा यांनी यापूर्वी बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात दोषमुक्त करण्याची विनंती केली होती. तो अर्जही फेटाळला गेला होता. त्यामुळे नवनीत राणा यांना दोन्ही खटल्यांत कोर्टवारी करावी लागणार आहे.

राणा दाम्पत्याविरुद्ध भादंवि कलम 353 व 34 अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुह्यासंबंधी सीसीटीव्ही फुटेजचा भक्कम पुरावा पोलिसांच्या हाती असल्याचे सरकारी पक्षातर्फे अॅड. सुमेश पांजवानी यांनी सुनावणीवेळी सांगितले होते. त्याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली.