नवनीत कौर राणा म्हणतात ‘आमच्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री’

एकनाथ शिंदे हे नावाला मुख्यमंत्री असून खरे काम हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच करत आहेत अशी अनेकांची भावना आहे. यामुळे एकनाथ शिंदे हे नामधारी मुख्यमंत्री असून खरे मुख्यमंत्री हे फडणवीसच असल्याचे या लोकांचे म्हणणे आहे. खासदार नवनीत कौर राणा यांनी तर ही बाब जाहीरपणे बोलून दाखवली. त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना आमच्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असल्याचे म्हटले आहे.

नवनीत कौर राणा यांनी त्यांच्या भाषणात म्हटले की, ‘सगळ्यांना आपण उपमुख्यमंत्री वाटता, पण आमच्या मनात आपण मुख्यमंत्री आहात.’ काही दिवसांपूर्वी मिंधे गटासोबत असलेले आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात वाद निर्माण झाला होता. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतले, असा आशयाचे वक्तव्य रवी राणा यांनी केले होते. रवी राणांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मध्ये ओढले होते. मी जर खोके घेतले असेन तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावे, असे जाहीर आव्हानच बच्चू कडू यांनी दिले होते. यामुळे भाजप आणि शिंदे गटात वाद निर्माण झाला होता. नवनीत कौर राणा यांनी बुधवारी केलेले विधान हे याच वादाचा पुढचा अंक असल्याचे बोलले जात आहे.