
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत NCB ने क्रूझवरील ड्रगपार्टी उध्वस्त केल्याप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईप्रकरणी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या पार्टीमध्ये भाजपने मोहित भारतीय यांचा मेहुणा रिषभ सचदेव हा देखील होता. त्याच्यासह प्रतीक गाभा आणि अमीर फर्निचरवाला हे दोघेही क्रूझवर हजर होते. जर NCB ने या ड्रग पार्टी प्रकरणी 11 जणांना ताब्यात घेतले होते तर मग सचदेव, गाभा आणि फर्निचरवाला यांना का सोडले असा प्रश्न मलिक यांनी विचारला आहे. हा सगळा प्रकार बड्या आसामीच्या मुलांना फसवण्यासाठीचे षडयंत्र असून ते भाजपने रचल्याचा गंभीर आरोपही मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी या प्रकरणी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. रिषभ सचदेव हे मोहित भारतीय यांचे मेहुणे त्यांना सोडण्यासाठी वानखेडे यांच्यावर दबाव आणण्यात आला होता आणि त्यासाठी वानखेडे यांना फोन करण्यात आले होते असं मलिक यांनी म्हटलं आहे. खोटी प्रकरणे रचून बॉलीवूडला बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.






























































