भाजपला महायुतीत नकोसे नवाब मलिक अजित पवार गटातच!

माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर असलेल्या आरोपांमुळे त्यांना महायुतीत सहभागी करून घेण्यास भाजपचा विरोध आहे, मात्र मलिक हे महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार गटातच असल्याचे नवाब मलिक यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या पोस्टमधून स्पष्ट झाले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कथित आरोपांवरून नवाब मलिक यांना तुरुंगात जावे लागले होते, मात्र ते तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली असल्याने मलिक काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक सत्ताधारी बाजूला बसल्याने भाजपने बराच आकंडतांडव केला होता. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पत्र धाडत मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध केला होता. दरम्यान, अजित पवार गटानेही मलिक यांना काहीसे दूरच ठेवले होते.