
सामना प्रतिनिधी । मुंबई
सध्याचा काळ खूप भयावह आहे. त्यातही आपण गप्प राहणे हे खूप खतरनाक आहे. खरे तर विविधतेत एकता ही जगात आपली ओळख आहे. विविध धर्म, भाषा, विचारांची समृद्धी इथे आहे. ती आपल्याला गमवायची नाही. त्याचवेळी आपण सारे हिंदुस्थानी आहोत. ती हिंदुस्थानीयत आपण सोडायची नाही, असे आवाहन प्रख्यात इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांनी केले.
यवतमाळ येथील मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण मागे घेतल्याबद्दल नयनतारा सहगल यांची माफी मागण्यासाठी ‘चला एकत्र येऊ या’ हा कार्यक्रम साहित्यक आणि विचारवंत यांनी आज शिवाजी मंदिर येथे आयोजित केला. यावेळी सहगल यांचे व्यासपीठावर आगमन होताच सर्वांनी उभे राहून टाळय़ांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. सहगल यांनी महाराष्ट्रातील रसिकांचे आभार मानले. साहित्य संमेलनात मी वाचू न शकलेल्या भाषणाचे महाराष्ट्रात ठिकठिकाणी अभिवाचन झाले. असे अन्यत्र कुठेही झाले नाही. म्हणूनच मी जय महाराष्ट्र म्हणू इच्छिते.
मूलभूत स्वातंत्र्याचा प्रश्न आज गंभीर आहे. जीवनाचा नैतिक पोत सुधारला पाहिजे. ते काम विचारवंत, कलावंतांनी केले पाहिजे, असे पुष्पा भावे म्हणाल्या. कार्यक्रमात ज्येष्ठ भाषातज्ञ गणेश देवी, प्रा. पुष्पा भावे, अमोल पालेकर, जयंत पवार, गायक टी. एम. कृष्णा, प्रज्ञा दया पवार, समीना दलवाई, सिद्धार्थ वरदराजन, प्रवीण बांदेकर सहभागी झाले. समाजात अभिव्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी होत असताना फिल्म इंडस्ट्रीतून कुणीही आवाज उठवत नाही ही खेदजनक गोष्ट आहे. डेहराडून येथे बसून मी नसिरुद्दीन शहा यांचा दुःखी आवाज ऐकला. तो आवाज देशातील प्रत्येक मुस्लिमाचा आहे, त्यांच्या वेदनेचा आहे, मात्र फिल्म इंडस्ट्रीच्या एकाही स्टारला तो ऐकू गेला नाही. इंडस्ट्रीतील एकाही व्यक्तीने नसिरुद्दीनला पाठिंबा दिला नाही.


























































