
देशातील सत्ता केंद्रित करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. देशातील अनेक राज्यांतील सत्ता बरखास्त करण्याचा प्रयत्न होतोय. हा प्रयत्न पक्षाला ताकद देणारा असू शकतो. जनता बोलत नाही, ती बघत असते, निरीक्षण करीत असते. त्यामुळे आज ना उद्या जनता ही सत्ता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपला दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणीची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज पार पडली. या बैठकीत शरद पवार म्हणाले, संसदीय लोकशाहीवर हल्ला करण्याचे काम सध्या भाजप करत आहे. मध्य प्रदेश असेल आणि आता महाराष्ट्रात काय झाले तुम्हाला माहीत आहे. लोकशाही मार्गाने आलेल्या लोकांना बाजूला करून सत्ता आपल्या हातात कशी राहील, असा प्रयत्न होत आहे. हा सत्तेचा दोष आहे. सत्ता केंद्रित झाली तर ती एका हातात जाते. ती सत्ता विकेंद्रित झाली पाहिजे तर ती अनेक लोकांच्या हातात जाते. मात्र हल्ली केंद्रातील सरकार केंद्रित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ईडी, सीबीआय या गोष्टी आपल्याला याआधी कधी माहीत नव्हत्या. ईडीचा काँग्रेसकडून कधी वापर झाला नाही, मात्र आता सत्तेचा वापर करून राजकीय दहशत निर्माण केली जात आहे. त्यामुळे सर्वांसाठी आज हा संघर्षाचा काळ आहे, असेही शरद पवार म्हणाले.
सर्वसामान्य माणसांसाठी आंदोलने करा
पाऊस कमी झाल्यावर आपल्याला जोमाने अडीच वर्षे काम करायचे आहे. लोकांशी संपर्क करायचा आहे, त्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्यात. रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल आणि ही आंदोलने सर्वसामान्य माणसाच्या माध्यमातून करावी आणि त्यामुळे पक्षाला वेगळे भवितव्य पाहायला मिळेल असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
शिवसैनिक एकत्र होतोय, राज्यात वेगळे चित्र पाहायला मिळेल
आज ज्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये शिवसैनिक कुठे हलला नाही. ज्यांनी सत्ताबदल करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याविरोधात हा शिवसैनिक एकत्र झाला आहे. एखाद् दुसरा सोडला तर एकही निवडून येणार नाही हे मला शिवसैनिक सांगत आहेत. सत्ता परिवर्तन झाले ते लोकांना आवडलेले नाही. शिवसैनिक नाराज आहेत. त्यामुळे एक वेगळे चित्र राज्यात आगामी काळात पाहायला मिळेल, असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले.
आगामी निवडणुका कशा लढायच्या याबाबत पक्ष निर्णय घेईल
आगामी निवडणुका कशा लढणार आहोत याचा निर्णय पक्ष नक्की घेईल. पक्षाने निर्णय घेतला की तिकडे सगळे लक्ष केंद्रित करा. आगामी नगर परिषद, नगरपालिका निवडणुकात नेतृत्वाची फळी तयार करण्याची व सर्व घटकांना न्याय कसा देता येईल याचा विचार झाला पाहिजे. यावेळी 50 टक्के नवीन तरुण पिढी घ्या, त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहा. हीच पिढी आपल्या पक्षाच्या पाठीशी उभी राहील, असे शरद पवार म्हणाले.
ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हायला हव्यात
ओबीसी आरक्षणाच्या बाबत आज कोर्टाने निकाल दिला आहे. निवडणुकीत ज्यांनी अर्ज भरले आहेत तिथे निवडणुका घ्या आणि भरले नाहीत तिथे घेऊ नका असा निर्णय दिल्याचे कळतेय. त्यामुळे आता निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजाला घेऊन निवडणुका झाल्या पाहिजेत ही पक्षाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे ही एक संधी आहे, असेही शरद पवार म्हणाले.


























































