नगरच्या जागेवरून राष्ट्रवादीची खलबते सुरुच 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर जागेवरुन काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये चांगलीच खलबते सुरु झाली आहेत. त्यातच दुसरीकडे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा न सोडण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसचे सुजय विखे यांनी भाजपकडे उमेदवारीसाठी मागणीही केली असल्यामुळे शक्यतो उद्या त्यांचा भाजप प्रवेश निश्‍चित असल्याचे बोलले जात आहे. त्या दृष्टीकोणातून आज त्यांनी त्यांच्या समर्थकांना मुंबईत बोलावले आहे. तर दुसरीकडे राज्याचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे हे विरोधीपक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा नगरमध्ये जोर धरु लागली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या जागेवरुन काँग्रेस व राष्ट्रवादीत सध्या चांगलीच रस्सीखेच सुरु होती. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचेपुत्र सुजय विखे यांना नगरची जागा द्यावी अशी मागणी करण्यात आली हेाती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा राष्ट्रवादी लढविणार असल्याचे बोलूनही दाखवले होते. त्यामुळे सुजय विखे यांची नाव आघाडीमध्ये निश्‍चित होणार की नाही याबाबत कालपर्यंत संभ्रमावस्था होती. तर दुसरीकडे सुजय विखे यांनी भाजपशी संधान साधून उमदेवारी मिळवण्यासाठी भेटीगाठी घेतल्या हेात्या. आज दिल्लीत काँग्रेसच्या कोर समितची बैठक होणार हेाती, या बैठकीला विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे उपस्थित होते. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नगरच्या जागेबाबत बोलणी सुरु आहे. विखे यांनी घाई करु नये असे वक्तव्य त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले होते.

कोअर कमिटीच्या बैठकीत अद्यापर्यंत नगरच्या जागेवर सायंकाळी निर्णय घेण्यात आलेला नव्हता, त्यामुळे काँग्रेसला ही जागा देणार की नाही याबद्दल आता साशंकता निर्माण झाली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसने देखील नगरची जागा लढविण्यासाठी माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे सुपुत्र प्रशांत गडाख यांना पुन्हा विचारणा केली आहे, तर दुसरीकडे अनुराधा नागवडे व आमदार अरुण जगातन यांचे नाव पर्याय म्हणून घेतले जात आहे.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विखेंच्या राजकारणावर चांगलीच टीका करुन 1991 साली झालेल्या प्रकाराची आठवण देखील करुन देताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी विखेंचा पराभव आम्ही याच मतदारसंघात केला होता असे सांगण्यास सुध्दा पवार विसरले नाहीत, विखेंच्या पक्षनिष्ठेबद्दल आपल्याला काहीच बोलायचे नाही असेही त्यांनी यावेळी सांगितल्याने नगरमध्ये त्या वक्तव्याच्यामधून ही जागा राष्ट्रवादीच लढविणार हे निश्‍चित झाले आहे. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकार्‍यांना वरिष्ठ पातळीवरुन आता सुचना केव्हा येतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सुजय विखे यांचे नाव भाजपाकडुन आल्यानंतर भाजपमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. आज सकाळी मुंबई येथे खासदार गांधी यांच्या समर्थकांनी दिलीप गांधी यांना उमदेवारी दयावी यावरुन जोरदार घोषणाबाजी केली. काही प्रमाणात गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला होता. गेल्या दोन दिवसापसून गांधी समर्थकांनी उमेदवारीसाठी आता गळ घालण्यास सुरवात केली आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या काही नगरसेवकांना फोन करुन गांधीनाच उमेदवारी द्या असे संदेश देखील गेले हेाते. विशेष म्हणजे खा. गांधी दिल्ली येथे तिकीटासाठी तळ ठोकूण आहेत. त्यातच आता सुजय विखे यांचा भाजप प्रवेशाचा विषय जवळपास निश्‍चित होत आला आहे. विखे समर्थकांना या संदर्भातले निरोपही विखे यंत्रणेमार्फत पाठवण्यात आलेले आहे. काहींना उद्या तर काहींना तातडीने मुंबईत येण्यास सांगितले आहे. त्यामुळे बहुधा विखेंचा प्रवेश भाजपात उमेदवारी निश्‍चत झाली असून त्यांना उमेदवारी दिली जाणार की नाही हे निश्‍चित होणार आहे.

विखेंच्या या खेळीने विरोधपक्ष नेते राधाकृष्ण विखे मात्र चांगलेच अडचणीत सापडले गेले आहे. वरिष्ठ पातळीवरुन राधाकृष्ण विखे यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. जर सुजय विखे यांनी प्रवेश केला तर विरोधीपक्ष पदाचा राजीनामा सुध्दा देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आज झालेल्या सर्व घडामोडीमुळे विखे समर्थक भाजपच्याच वाटेवर असल्याचे दिसून आले आहे.

एकंदरीतच जिल्ह्याच्या राजकारणात नगरच्या जागेवरुन अनेक तर्क वितर्क मांडले जात असताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी मात्र सावध भूमीकेत ओह. ऐनवेळेला उमेदवारी माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादीसुध्दा आता खलबते सुरु झाली आहेत. वरिष्ठ पातळीवरुन काय आदेश येतात त्यावरुन राष्ट्रवादीची पुढील दिशा ठरणार आहे. एकंदरीतच आघाडीबरोबर आता भाजपमध्येसुध्दा काही प्रमाणात चिंतचे वातावरण भाजप समर्थकांमध्ये खास करुन गांधी समर्थकांत असल्याने जिल्ह्यामध्ये सध्या उमेदवारीवरुनच नराजकीय घडामोडी सुरु झाल्या आहेत. येत्या दोन तीन दिवसात नगरचे चित्र स्पष्ट होईल.