राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी फिरवली मुलाखतींकडे पाठ, भाजपमध्ये जाण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

भारतीय जनता पक्षाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर यांनी काल व आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखतींकडे पाठ फिरवल्यामुळे ते भाजपामध्ये जातात की काय असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान उद्या 29 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता गोरठेकर सर्मथकांची एक विशेष बैठक दतात्रय रेड्डी कृषी सभापती जिल्हा परिषद, नांदेड यांच्या निवासस्थानी बोलवण्यात आली आहे.

भोकर विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणूकीत चव्हाणांचे मताधिक्य 45 हजारावरून घटून 4900 पर्यंत खाली आले. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजय संपादन केल्यानंतर लोहा-कंधार मतदार संघातून दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांना खासदार चिखलीकरांसोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर यांनी हजेरी लावली. त्यामुळे विरोधकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान काल आणि आज नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला ते उपस्थित राहीले नाहीत. शहराध्यक्ष सुनिल कदम, आ. सतिश चव्हाण यांच्या उपस्थितीत या मुलाखती पार पडल्या. या मुलाखतीसाठी जिल्हाध्यक्षांची गैरहजेरी चर्चेचा विषय बनली होती. त्यांना निमंत्रण देऊनही ते या मुलाखतींना अनुपस्थीत राहील्याने राष्ट्रवादीत एकच खळबळ माजली आहे.