राज्यात केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचेच सरकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत विचित्र मार्गाने आलेल्या या सरकारमध्ये केवळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दोघेच आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळत नाही. तसेच सरकारला 15 दिवस उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार करता आलेला नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

जयंत पाटील यांनी हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, हे विचित्र सरकार आल्यापासून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे सामान्य जनतेसह पूरग्रस्तांना कोणतीही आर्थिक मदत तत्काळ देण्यास असमर्थ ठरत आहे. हे सरकार मंत्रीसंख्या आणि खातेवाटपाच्या पेचात अडकल्याचे दिसत आहे. पूर्वीचा निर्णय बदलून जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. विचित्र मार्गाने आलेले हे सरकार फार काळ टिकणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.