
आमदार नीलेश यांच्या उपोषणाबाबत कोणताही तोडगा दृष्टीपथात येत नसल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व नीलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी नगर-पुणे रस्त्यावर सुपे येथे तसेच नगर कल्याण रस्त्यावर टाकळी ढोकेश्वर येथे रास्ता रोको आंदोलन केले. लंकेंच्या उपोषणाची दखल घेऊन नगर जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांच्या दुरूस्ती संदर्भात जिल्हा प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको दरम्यान बोलताना दिला आहे.
नगर-पुणे रस्त्यावर सुपे येथे तसेच नगर-कल्याण मार्गावर टाकळी ढोकेश्वर येथे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी दोन्ही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. टाकळी ढोकेश्वर येथे आंदोलक व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. अचानक आंदोलन केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या 15 कार्यकर्त्यांना नोटीस बजावली.
नगर जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांची दुरूस्ती करावी या मागणीसाठी आमदार लंके यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा तिसरा दिवस होता. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आमदार लंके यांचे वजन तीन किलोने कमी झाले असल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आले. ही माहिती आंदोलकांना समजल्यावर आंदोलक अधिक आक्रमक झाले. लंके यांच्यासह त्यांच्या समवेत उपोषणाला बसलेल्या एकाही कार्यकर्त्याच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.


























































