बेल्जियम, नेदरलॅण्डचे दणदणीत विजय, रोनाल्डोच्या गोलमुळे पोर्तुगालची सरशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेल्जियम व नेदरलॅण्ड या बलाढय़ संघाने फिफा वर्ल्ड कप पात्रता फेरीत गोलांचा पाऊस पाडत दणदणीत विजय साकारले. बेल्जियमने मंगळवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत बेलारूसचा 8-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. नेदरलॅण्डने जिब्राल्टर संघाला 7-0 अशा फरकाने धूळ चारली. या दोन शानदार विजयांसह पोर्तुगाल संघानेही ख्रिस्तीयानो रोनाल्डोच्या दमदार गोलच्या जोरावर लक्झेमबोर्गला पराभूत केले.

झंझावात सुरूच

पोर्तुगालने लक्झेमबोर्गला 3-1 अशा फरकाने हरवत ‘अ’ गटात सात गुणांसह पहिले स्थान कायम राखले. या विजयात ख्रिस्तीयानो रोनाल्डो याने एक गोल करीत मोलाचा वाटा उचलला. याचसोबत 2004 सालापासून त्याने प्रत्येक वर्षी पोर्तुगालसाठी किमान एक गोल तरी केला हे विशेष. तसेच वर्ल्ड कप पात्रता फेरीतील त्याचा हा 31वा गोल ठरला हे विशेष.

वर्ल्ड रेकॉर्ड बरोबरीसाठी हवेत सहा गोल

ख्रिस्तीयानो रोनाल्डोच्या शिरपेचात लवकरच मानाचा तुरा खोवला जाणार आहे. आतापर्यंत त्याने पोर्तुगालसाठी 173 लढती खेळल्या असून या कालावधीत त्याने 103 गोल केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करण्याचा रेकॉर्ड इराणच्या अली देईच्या नावावर आहे. त्याने 149 सामन्यांमध्ये 109 गोल केले आहेत. ख्रिस्तीयानो रोनाल्डोला त्याच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी आणखी सहा गोलांची आवश्यकता आहे.