कुडाळात लवकरच सिनेमागृह उभारणार -आमदार वैभव नाईक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीतून कबड्डी हा खेळ एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. कबड्डी खेळाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला असून या खेळातून चांगले खेळाडू निर्माण होत आहेत. कबड्डी बाबत लोकांची असलेली आवड जपावी व या मातीतील कबड्डीपट्टूंना प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने सलग पाच वर्षे ही कबड्डी स्पर्धा आयोजित केली जात आहे. या स्पर्धेला कुडाळ मालवण तालुक्यात नागरिकांचा व खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. स्पर्धेचे सातत्य असेच यापुढे टिकवले जाणार आहे. याठिकाणी सुसज्ज असे क्रीडा संकुल साकारले जात आहे. त्याच प्रमाणे मछिंद्र कांबळी नाट्यगृह, व अद्यावत बसस्थानकाचे काम सुरु असून लवकरच कुडाळात सिनेमागृहही उभारण्याचे आश्वासन शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले.

युवासेना कुडाळ व युवक कल्याण संघ कणकवली आयोजित आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा शानदार उदघाटन सोहळा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या हस्ते कुडाळ क्रीडा संकुल मैदान येथे शुक्रवारी पार पडला. श्रीफळ वाढवून मैदानाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर कबड्डीच्या पहिल्या पर्वास दिमाखात सुरवात करण्यात आली.

यावेळी अरुण दुधवडकर म्हणाले, सलग पाच वर्षे आमदार वैभव नाईक ही कबड्डी स्पर्धा आयोजित करत आहेत. त्यामुळे जिल्हयात कबड्डी खेळाला चांगले वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील खेळाडूंना यातून प्रेरणा मिळत आहे. सध्या खेळाच्या माध्यमातून युवक आपले भविष्य साकारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कबड्डी पटूंना प्रोत्साहन देऊन त्यांना एक मंच आमदार वैभव नाईक यांनी उपलब्ध करून दिला आहे. आमदार नाईक मतदार संघात करत असलेले काम खरोखरच गौरवास्पद आहे. हार जीत ही खेळात असतेच त्यामुळे प्रत्येक खेळाडूने उत्कृष्ट खेळ खेळून आपले नाव उज्वल करावे असे त्यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जि. प सदस्य संजय पडते, नागेंद्र परब, अमरसेन सावंत, राजू कविटकर, पोलीस निरीक्षक जगदीश काकडे, महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, जयभरात पालव, राजू शेट्ये सुशांत नाईक, हर्षद गावडे, अतुल बंगे , अनुप नाईक सचिन काळप ,शीतल कल्याणकर जिल्हा कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत नेवगी, बाळा वेंगुर्लेकर,उदय मांजरेकर राजू गवंडे , महेश सावंत, प्रज्ञा राणे, मेघा सुकी, श्रेया गवंडे, संजय भोगटे राजू जांभेकर योगेश धुरी, कृष्णा तेली,मितेश वालावलकर, संदीप म्हाडेश्वर आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व कुडाळवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.