
‘नमस्कार, संध्याकाळचे सात वाजतायत. मी प्रदीप भिडे. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर…’ अशा भारदस्त आवाजात दूरदर्शनवरील बातमीपत्राची सुरुवात करणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. बातम्या वाचण्याच्या खास शैलीमुळे ते दूरदर्शनवरील बातम्यांची ओळख बनले होते. त्यांच्या निधनामुळे माध्यम तसेच विविध क्षेत्रांतून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रदीप भिडे यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
प्रदीप भिडे यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. तिथे विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर रानडे इन्स्टिटय़ूटमधून त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. सुरुवातीच्या काळात बहुराष्ट्रीय कंपन्यांत त्यांनी जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर ते रत्नाकर मतकरी यांच्या नाटय़संस्थेच्या माध्यमातून नाटय़क्षेत्राशी जोडले गेले. 1974 पासून ते 2016 पर्यंत त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केले. आपल्या बहारदार आवाजाने त्यांनी वृत्तनिवेदन क्षेत्रात चार दशके अधिराज्य गाजवले. 24 तास बातम्या देणाऱया वाहिन्यांचा जमाना येण्यापूर्वी एकेकाळी बातम्या देणारे ‘दूरदर्शन’ हे एकमेव दृश्राव्य माध्यम होते. त्यावेळी भिडे यांनी वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. राज्य आणि देशातील अनेक मोठय़ा आणि महत्त्वाच्या घडामोडीवर भिडे यांनी केलेले वृत्तनिवेदन आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.
पाच हजार जाहिराती, दोन हजार कार्यक्रम
‘प्रदीप भिडे कम्युनिकेशन’ या नावाने त्यांनी ध्वनिमुद्रण स्टुडिओ निर्मिती संस्था सुरू केली. पुढे त्यांनी या क्षेत्रात जम बसवत जाहिराती, माहितीपट आणि लघुपट यावर आपल्या आवाजाचा ठसा उमटवला. भिडे यांनी सुमारे पाच हजारांहून अधिक जाहिराती, माहितीपट आणि लघुपटांना आवाज दिला आहे. याशिवाय दोन हजारांहून अधिक कार्यक्रम, सभांचे सूत्रसंचालन आणि निवेदन केले आहे.
आवाजाने घराघरात पोहोचलेले व्यक्तिमत्त्व; मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
वृत्त निवेदनातून आपल्या आवाजाने घराघरात पोहचलेले, बातम्या, घडामोडींच्या क्षेत्रातील जाणकार आणि निरलस, निखळ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ वृत्त निवेदक प्रदीप भिडे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटलेय, दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्यांचे युग सुरू होण्याआधीच भिडे यांनी प्रादेशिक बातम्या आणि त्यातही मराठी वृत्त निवेदनात एक मापदंड निर्माण केला. त्यांचा आवाज व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच भारीभक्कम होता. त्यांची वृत्त निवेदनाची, सूत्रसंचालनाची शैली ही त्यांची ओळख बनून घराघरात पोहोचली. मराठी बातम्यांमधील शब्दांचे उच्चारण ते संयमित सादरीकरण यासाठी ते सदैव लक्षात राहतील. प्रदीप भिडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.




























































