कोल्हापूर विमानतळावर होणार नाइट लॅण्डिंग, विस्तारीकरणासाठी राज्य सरकारकडून 52 कोटींचा निधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. सिंधुदुर्गातील चिपी, नांदेड, गोंदिया, नाशिक तसेच कोल्हापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली आहे. या विमानतळांपैकी कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकारने 52 कोटी 72 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीमुळे कोल्हापूर विमानतळावर नाइट लँडिंग तसेच इतर सुविधा उपलब्ध होऊन निसर्ग पर्यटन व धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरचा विमानतळ अतिशय मोक्याचा आहे. हा विमानतळ सुरू झाला आहे. तिरुपती दर्शन करून कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला येणाऱया भाविकांची संख्या मोठी आहे. त्यासाठी विशेष ट्रेनही आहे. तिरुपती-कोल्हापूर विमानसेवाही आहे. पण या विमातनळावर नाइट लँडिंगची सुविधा नाही. त्यामुळे धावपट्टी वाढण्यासाठी भूसंपादनाची गरज भासणार आहे. या भूसंपादनासाठी राज्य सरकारने 52 कोटी 72 लाख 57 हजार 500 रुपयांचा निधी वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मालवाहतुकीला चालना

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी, नांदेड, गोंदिया व नाशिकमधून विमानसेवा सुरू झाली आहे. शिर्डी विमानतळावरून आतापर्यंत 11 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. आतापर्यंत शिर्डी विमानतळावरून मालवाहू विमानाने 1 लाख 70 हजार किलो शेतमाल देशाच्या इतर भागात वाहून नेण्यात आला आहे.

भविष्यातील योजना

महाराष्ट्र राज्य विमानतळ कंपनीकडून सोलापूर, अमरावती, कराड, धुळे व चंद्रपूरमध्ये विमानसेवा सुरू करण्याची योजना आहे. सोलापूर, अमरावती, कराड व चंद्रपूरमध्ये जागा उपलब्ध आहे. या प्रकल्पासाठी सध्या केंद्र सरकारच्या परवानग्या, पर्यावरण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र यासह इतर आवश्यक परवानग्या घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ग्रीनफिल्ड विमानतळांची योजना

महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाकडून राज्यातील विमानतळांसाठी पाठपुरावा सुरू आहे. ‘उडाण’ योजनेअंतर्गत नऊ विमानतळांपैकी सहा विमानतळांवरून विमानसेवा सुरू झाली आहे. जमिनी संपादित केलेल्या ठिकाणी नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यात येत आहे. त्यासाठी विमानतळ प्राधिकरणासह विविध पेंद्रीय विभागांच्या परवानग्या मिळवण्याचे राज्य सरकारमार्फत काम सुरू आहे.

 कोणत्या विमानतळासाठी किती जमिनीचे भूसंपादन

   धुळे           63 हेक्टर

   कराड         67 हेक्टर

   चंद्रपूर        336 हेक्टर

   अमरावती       409 हेक्टर

   सोलापूर        549 हेक्टर

   नवी मुंबई        1 हजार 160 हेक्टर

पालघर विमानतळाची योजना

पालघरमध्ये विमानतळ उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने आखली आहे. मुंबई विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी पालघरमध्ये विमानतळ उभारण्यासाठी हालचाल सुरू झाली आहे.