“भरतखंडी पायी संचार करुनी धर्मसंस्थापनाचा मार्ग दाखवला स्वामींनी “

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलकंठ कुलकर्णी ([email protected])

।। श्री गुरुदेव दत्त ।।

” श्रीगुरूंची आज्ञा मोडता न येणे वासुदेव स्वामींना, भरतखंडी पायी संचार करुनी उपदेशी भक्तांना स्वामी, धर्मसंस्थापनाचा मार्ग दाखविला स्वामींनी,

।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।

श्री महाराजांचा सर्व संचार श्री दत्ताज्ञेनेच होत असे. त्यांत याकिंचितही बदल देवांना खपत नसे. लगेच शिक्षा होई. उदारणार्थ महत्पूरचा 11वा चातुर्मास झाला की लगेच ब्रह्मवर्ताला जाण्याची आज्ञा झाली. पण महाराजांनी विचार केला की लवकरच ग्रहण आहे, तेव्हा क्षिप्रास्नान करूनच निघावे. त्याच रात्री एक अत्यंत विषारी नागाचा त्यांना दंश झाला. औषधे घेणे तर वर्ज्यच होते सर्व भक्त चिंताग्रस्त झाले. श्री महाराजांनी लगेच समाधी लावली. समाधीतून युत्थान होताच पुन्हा विषाचा जोर वाढे व तीव्र वेदना सुरू होत. तेव्हा महाराजांनी पुनश्च समाधीत जावे, असा क्रम दोन दिवस सतत चालल्यावर विषाचा संवेग थोडा कमी झाला. डोके मात्र फारच जड पडले होते. तेव्हा दंशस्थानाची तपासणी करता दांत त्या जखमेत मोडून मोडून घुसलेला दिसला. तो काढल्यावर थोडा आराम पडला. पुढे दहावे दिवशी महत्पूर सोडल्यावरच विष पूर्णपणे उतरून महाराजांना बरे वाटले.

असाच प्रसंग नरसीच्या चातुर्मासानंतर भेलशाला दत्तजयंती केली तेथे झाला. दत्तजयंतीचा उत्सव होताच लगेच पुढे जाण्याची आज्ञा झाली. स्थानिक भक्तमंडळींनी उत्सवाच्या सांगतेची सर्व तयारी केली असल्याने त्यांनी आग्रह केला श्रीमहाराजांनी ‘ देवांची आज्ञा आपल्याला मोडता येत नाही’ असे सांगूनही तेथील लोकांनी श्रीमहाराज थांबले नाहीतर गावांत चूल पेटणार नाही व सहस्त्रभोजनाचे सर्व सामान गंगापर्ण करू’ असे सांकडे घातले. तेव्हा मात्र महाराजांना राहणे भाग पडले. फक्त त्या दिवशी ग्रामांतर करून महाराज दुसरे दिवशी परत भेलशाला आले. तो सहस्त्रभोजनाचा बेत उत्तम पार पडला मात्र त्याच रात्री ध्यानावस्थेत श्री महाराजांच्या गालावर एक जोराची थप्पड बसली व एक डोळा व एक कान काम करीनासे झाले. ही आज्ञा तंतोतंत न पाळल्याची देवांनी शिक्षा केली, हे जाणून महाराजांनी हा आज्ञाभंग सर्व ब्राह्मणवृंदाच्या समाधानासाठी झाल्याचे ‘श्रींच्या निदर्शनास आणून यावरही आपणास रोष असेल तर राहिलेला कान व डोळा ही घालून टाकावा म्हणजे पुन्हा चूक होण्याची भीती नाही’ अशी प्रार्थना केली हे ऐकून दत्तप्रभु हसले व गुप्त झाले तो डोळा व कान अर्थातच पूर्वव् त चांगले झाले.

अशा नित्य दत्त प्रेरणेने श्री महाराजांचा संचार आसेतूहिमाचल झाला. फक्त काश्मीर मात्र, श्री दत्तप्रभूंच्या आग्रहाकडे दुर्लक्ष करून व प्रसंगी त्यांच्याशी विरोध पत्करूनही श्रीमहाराज गेले नाहीत. त्या देवभक्तांच्या मतभेदाची हकीकत इतरत्र येणारच आहे. असे काही अपवाद वगळता श्री स्वामी महाराजांचा सर्व संचार श्री दत्ताज्ञेनेच सतत चालू होता. ह्या सर्व संचारात संन्यासाश्रमाचे नियम किती कडकपणाने पाळले जात होते, याचे वर्णन इतरत्र आले आहेच. हे वर्णन आपल्याला खरे सुद्धा वाटू नये असे आहे स्थूल शरीराकडे पूर्ण दुर्लक्ष करून संन्यासाश्रमाचा एक अलौकिक देदीप्यमान आदर्श श्रीमहाराजांनी सर्वां पुढे ठेवला .

केवळ त्यांच्या दर्शनानेच नास्तिक आस्तिक आस्तिकाचे मुमुक्षु आणि मुमुक्षु मुमुक्षूंचे साधक आणि साधकांचे सिद्ध झाले. हाच लोक संग्रह श्री स्वामी महाराजांच्या लोकसंग्रहाची माहिती आपण आधीच्या एका लेखांत पाहिली आहेच. श्री महाराजांच्या परिभ्रनांत हरिद्वार येथे तिसरा चातुर्मास करून महाराज हिमालयांत गेले शके 1818 ( इ.स 1896 ) च्या वैशाख पौर्णिमेस हरिद्वार येथेच सहावा चातुर्मास केला असे वर्णन त्यांच्या चरित्रात आहे. हा दोन वर्षांचा काळ त्यांनी हिमालयात कुठे काढला, याची काहीच माहिती उपलब्ध नाही. श्रीमद आद्य शंकराचार्याच्या चरित्रातह त्यांनी काही काळ व्यास महर्षीच्या आश्रमांत काढला, असे वर्णन आहे. असेच वर्णन रामानूजाचार्य व मध्याचार्य यांच्यासारखा काही आचार्यांच्या चरित्रांतही आले आहे. यावरून असा एक तर्क करता येतो की, श्री स्वामी महाराजांचे ही वास्तव्य या कालांत व्यासमहर्षीच्या आश्रमात झाले असावे. श्री दत्त संप्रदायाच्या ह्या आचार्यांनी पूर्वीच्या आचार्या प्रमाणे व्यासमहर्षीचे मार्गदर्शन लाभले असावे असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.

सर्व ठिकाणी श्री महाराजांच्या पुढे लोक फळे वस्त्रे आदी वस्तू आणि बऱ्याच वेळा द्रव्याही ठेवत. पैशाखेरीज इतर वस्तू महाराज लगेच काढून टाकीत. त्यांचा संग्रह किती नगण्य होता याचे वर्णन पूर्वी पहिलेच आहे. नरसोबाच्या वाडीत पैशांवर पुजाऱ्याचा अधिकार होता. इतर ठिकाणी मात्र तो देवाचा खजिना होता. त्याचा विनियोग देवांच्या आज्ञेनेच होई. मुख्यतः जमलेल्या भक्त मंडळींच्या भोजनासाठी व धार्मिक कार्यासाठी त्यांचा उपयोग होई.

एकदा चिखलद्याला चातुर्मास 22 इ.स 1902 गुरुपौर्णिमेच्या स्वयंपाकाकरिता महाराजांनी नर्मदेच्या पुजाऱ्याच्या जागेत देवाच्या खजिन्यातून एक छप्पर बांधविले, त्याच दिवशी महाराजांना देवांचा दृष्टांत झाला. आमच्या पैशातून बांधलेल्या जागेत पुजाऱ्याने राहता कामा नये तरी ते छप्पर पाडून महाराज म्हणाले, आजचा दिवस जाऊ दे उद्या पाहू. परंतु हे दत्तप्रभूंना पटले नाही, ते छप्पर त्यांनी त्या रात्रीच पाडून टाकले.