गडकरींना धमकीचे फोन बेळगाव तुरुंगातून, तरुणी संशयाच्या भोवऱ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयात मंगळवारी धमकीचे फोन आले होते. हे फोन कोणी केले याबाबतचे गूढ वाढत चालले आहे. नागपूर पोलिसांनी धमकीचे फोन हे बेळगावातील तुरुंगातूनच आल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आल्याचे सांगितले आहे. प्राथमिक तपासात फोनचे लोकेशन हे बेळगांव तुरुंगच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या धमकी प्रकरणात एका तरुणीचेही नाव पुढे येऊ लागले आहे. रझिया असे या तरुणीचे नाव असल्याचे सांगितले जात असून तिचा या धमकीच्या फोनप्रकरणात काय सहभाग आहे हे तपासण्यासाठी तसेच इतर तपासासाठी नागपूर पोलिसांचे एक पथक बेळगांवला रवाना झाले आहे.

जी तरुणी संशयाच्या भोवऱ्यात आहे ती सध्या रुग्णालयात असल्याचे कळाले आहे. धमकीचे फोन येण्याच्या आधीपासूनच ती रुग्णालयात दाखल आहे. या तरुणीने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार तिला एक फोन आला होता, ज्यामध्ये तिला सांगण्यात आलं होतं की तिचा मोबाईल नंबर काही कामासाठी देण्यात आला आहे. यामुळे धमकीचा फोन हा या तरुणीने केला, का तिचे नाव वापरून अन्य कोणी केला हे कळू शकलेलं नाही. यापूर्वीही गडकरी यांना धमकीचे फोन आले होते आणि धमकी देणारा हा बेळगांवच्या तुरुंगात कैद असलेला जयेश पुजारी असल्याचं सांगण्यात येत होतं. मंगळवारी आलेल्या धमकीच्या फोनप्रकरणामध्येही जयेश पुजारी याचं नाव पुढे आलं आहे. यामुळे सदर प्रकरणाचा तपास करण्यासाठी नागपूर पोलिसांचं एक पथक बेळगांवला रवाना झाले आहे. रुग्णालयात असलेल्या तरुणीचे काही मित्र हे तुरुंगात होते. तिचे मित्र हे आता बाहेर आले असले तरी तुरुंगात असताना तरुणीच्या मित्रांचं आणि जयेश पुजारी या गुंडाचं काही संगनमत झालं होतं का ? याबाबतही पोलीस तपास करत आहेत.

गडकरींच्या घर, कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खामला येथील ऑरेंज सिटी चौकातील जनसंपर्क कार्यालयात पुन्हा एकदा दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकीचे फोन आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गडकरी यांच्या कार्यालय आणि त्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

मंगळवारी सकाळी तीन वेळा गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन आले. धक्कादायक म्हणजे, पुन्हा एकदा जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने धमकीचे फोन आले आहेत. यापूर्वी 14 जानेवारी रोजी देखील गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात अज्ञात व्यक्तीने दोन वेळा फोन करून धमकी दिली होती. पोलीस उपायुक्त राहुल मदने म्हणाले, मंगळवारी सकाळी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पुजारीच्या नावाने धमकीचे तीन फोन आले. मंगळवारी आलेला फोन बंगळुरूमधील एका युवतीचा आहे, तिचा मित्र कारागृहात शिक्षा भोगतोय. या प्रकरणी आम्ही गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.