
सामना ऑनलाईन । मुंबई
येत्या आर्थिक वर्षात वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये कोणतीही वाढ होणार नसल्याचे इन्शुरन्स रेग्युलेटरी ऍण्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटीने जाहीर केले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
एप्रिल महिना आला की वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये वाढ ठरलेली असते. गेल्या दहा वर्षांत थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये 10 ते 40 टक्के वाढ झालेली आहे. फक्त गेल्याच वर्षी दुचाकी, चारचाकी वाहनांच्या प्रीमियममध्ये 10 ते 20 टक्के कपात करण्यात आली होती. हा अपवाद वगळता थर्ड पार्टी इन्शुरन्स वाढीचा आलेख चढताच राहिला आहे. या वर्षीही इन्शुरन्स दरात 20 ते 30 टक्के वाढ होईल अशी अपेक्षा होती, मात्र या वर्षी प्रीमियमध्ये कोणताच बदल न करण्याचा निर्णय इन्शुरन्स रेग्युलेटरीने घेतला आहे. 1 एप्रिल 2018 रोजी जो प्रीमियमचा दर होता तोच या आर्थिक वर्षात लागू होईल असे जाहीर केलेय. या निर्णयाचे पॉलिसीधारकांनी स्वागत केले आहे.
थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे कार किंवा दुचाकीचा दुसऱ्या कुणाशी अपघात झाला तर त्या त्रयस्थांना असलेले विम्याचे संरक्षण.
प्रीमियम किती भराल
- 75सीसीपेक्षा कमी इंजिनाच्या दुचाकी वाहनांचा प्रीमियम 427 रुपये असेल, तर 75 ते 150 सीसीपर्यंतचे इंजिन असलेल्या दुचाकींचा प्रीमियम 720 रुपये असेल. हायपॉवर मोटरसायकलाचा आधीएवढाच 985 रुपये राहील.
- वर्षाला छोटी कारचा प्रीमियम 1850 रुपये तर एसयूव्हीचा 7890 रुपये असेल
- ऑटोरिक्षा आणि ई-रिक्षाचा प्रीमियम वर्षाला अनुक्रमे 2595 आणि 1685 रुपये असेल. छोटय़ा टॅक्सींसाठी 5437 आणि मोठय़ा व्यावसायिक कारसाठी 7142 रुपये द्यावे लागतील.
सहा वर्षांत प्रीमियममध्ये 29 टक्के वाढ
वाहन खरेदी करताना अनेक ग्राहक थर्ड पार्टी इन्शुरन्सला प्राधान्य देताना दिसत आहेत. गेल्या सहा वर्षांत कारच्या थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये 29 टक्क्यांनी तर दुचाकीच्या सरासरी 23 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती ‘पॉलिसीबाजार डॉटकॉम’चे मोटार विमा व्यवसायप्रमुख सज्जा चौधरी यांनी दिली.



























































