
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध आपल्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, अशी स्पष्ट कबुली मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली आहे. याप्रकरणी चौकशी करणाऱया आयोगासमोर परमबीर सिंह यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राव्यतिरिक्त देशमुख यांच्याविरुद्ध सादर करण्यास आपल्याकडे आणखी कोणतेही पुरावे नाहीत, असे त्यांनी त्यात नमूद केले आहे.
परमबीर सिंह यांनी चौकशी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती त्यांच्या वकिलांकडून मिळाली आहे. सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये एक पत्र पाठवले होते. त्यात त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. अनिल देशमुख हे पोलीस अधिकाऱयांना रेस्टॉरंट आणि बारमालकांकडून पैसे गोळा करण्यास सांगत असत, असा सिंह यांचा आरोप होता. सिंह यांच्या पत्राने खळबळ माजली होती. राज्य सरकारने देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदिवाल यांच्या एकसदस्यीय आयोगाची स्थापना गेल्या मार्च महिन्यात केली होती.
चांदिवाल आयोगाने चौकशीसाठी परमबीर सिंह यांना नोटीस बजावली होती, परंतु ते आयोगासमोर हजर झालेच नव्हते. परमबीर हे त्यानंतर बेपत्ताच झाले होते. अनेक समन्स आणि अजामीनपात्र वॉरंट जारी करूनही आतापर्यंत ते आयोगासमोर आलेले नाहीत. चौकशीसाठी गैरहजर राहिल्याबद्दल आयोगाने जून महिन्यात त्यांना पाच हजार रुपये दंड ठोठावला होता. त्यानंतरही दोन वेळा ते गैरहजर राहिल्याने प्रत्येकी 25 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. दरम्यान, परमबीर हे चंदिगडमध्ये आहेत, तर कधी ते रशियाला पळून गेले अशा चर्चाही रंगल्या होत्या.
पुरावेही नाहीत आणि चौकशीसाठीही तयार नाही
विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी चांदिवाल आयोगासमोर हजेरी लावली. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राव्यतिरिक्त अन्य कोणतेही पुरावे देण्यास नकार दिला असून ते चौकशीसाठीही तयार नाहीत असे त्यांचे वकील मनीष पांचाळ यांनी सांगितल्याची माहिती हिरे यांनी दिली. परमबीर सिंह यांच्या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याच प्रकरणात ते सध्या ईडीच्या कोठडीत आहेत; परंतु आता परमबीर सिंह यांनी पुरावेच नसल्याचे म्हटल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळणार आहे.































































