नगर जिल्ह्यात खरिपाच्या 60 टक्के पेरण्या, पावसाअभावी शेतकरी अडचणीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यात खरिपाची 60 टक्के पेरणी झाली आहे. पाऊस नसल्याने अजूनही अनेक ठिकाणी पेरणी करण्यास अडचण निर्माण झाली आहे. पावसाअभावी कापसाची लागवडही रखडली आहे, शिवाय झालेली पेरणी व कापसाचे पीक पावसाअभावी अडचणीत आले आहे. त्यामुळे पेरणी करणारे आणि न करणारेही शेतकरी संकटात आहेत.

नगर जिल्ह्यात खरिपाचे सरासरी 4 लाख 47 हजार 904 हेक्टर क्षेत्र आहे. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे खरिपाचे क्षेत्र वाढले होते. त्याच धर्तीवर यंदाही जवळपास पावणेसात लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होईल, असा अंदाज बांधून कृषी विभागाने नियोजन केले होते. मात्र, यंदा कापूस लागवडीला फारसा वेग आला नाही. जून सरला तरी अजूनही जिल्ह्यात पुरेसा पाऊस नाही. आतापर्यंत 2 लाख 61 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ही पेरणी 60 टक्के आहे.

आतापर्यंत मूग व उडदाने सरासरी ओलांडली आहे. तुरीची 135 टक्के, तर उडदाची 306 टक्के म्हणजे सरासरीच्या तिप्पट पेरणी झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. पेरणी झाली तेथेही पीक सुकू लागल्याने शेतकरी चिंतेत आहे. जामखेड, शेवगाव, नेवासा, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता या तालुक्यांत पेरणीचे प्रमाण नगण्य आहे.

पेरणी झालेले क्षेत्र हेक्टर (कंसात सरासरी क्षेत्र)

भात : 1647 हेक्टर (14,036 हेक्टर), ज्वारी : 66 (1666),  बाजरी : 58802 (140892),  रागी-नागली : 689 (195), मका : 23220 (32571), तूर : 20553 (15121), मूग :  30751 (40378), उडीद :  53889 (17596), भुईमूग : 4517 (7430), तीळ : 70 (100), कारळे : 319 (875), सूर्यफूल : 120 (534), सोयाबीन : 28627 (54274), कापूस : 33716 हेक्टर (114352 हेक्टर)