धरणांच्या पाणलोट क्षेत्राकडे पावसाची पाठ, 24 पैकी 12 धरणे कोरडी ठाक

67

सामना प्रतिनिधी । नाशिक

जुलै महिना उजाडला तरीही नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील मोठय़ा व मध्यम 24 धरणांपैकी 12 धरणे कोरडीठाक पडली आहेत. उर्वरित 12 धरणांमध्ये अवघा 3720 दशलक्ष घनफूट म्हणजे 6 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी हा साठा 13 टक्के होता. परिणामी, जिल्ह्याला यंदा जुलैमध्येही दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. पावसाने त्वरित हजेरी लावली नाही तर पाणीप्रश्न गंभीर होईल.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गोदावरी नदीवरील गंगापूर धरणाची साठवण क्षमता 5630 दशलक्ष घनफूट आहे. या धरणात आज अवघा 726 दशलक्ष घनफूट (13 टक्के) साठा आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला 2010 (36 टक्के) पाणी उपलब्ध होते. त्यातुलनेत यंदाचा साठा 23 टक्क्यांनी कमी आहे. आठ दिवसांपूर्वी 27 जूनला या धरणात 766 (14 टक्के) साठा होता, आज तो एक टक्क्याने कमी झाला आहे. शिल्लक पाणी जुलैअखेरपर्यंत पुरावे म्हणून महापालिकेने या आठवडय़ात पाणी कपातीला सुरुवात केली. तसेच दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची वेळ ओढावली आहे. या धरणाच्या त्र्यंबकेश्वर, आंबोली व गंगापूर या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. या भागात धुंवाधार पावसाने हजेरी लावल्यानंतरच धरणात पाणी येईल. त्यामुळे दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.

जिल्ह्यातील मोठे धरण कडवा, करंजवण, चणकापूर, मध्यम धरण आळंदी, वाघाड, पुणेगाव, तिसगाव, वालदेवी, भोजापूर, केळझर, नागासाक्या, माणिकपुंज हे कोरडेठाक आहेत. इतर धरणातही अत्यल्प साठा आहे.

वार्षिक सरासरीच्या 15 टक्केच पाऊस
नाशिक जिल्ह्याचा वार्षिक सरासरी पाऊस 1013.39 मिलिमीटर आहे. जुलैच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत अवघा 157 मिलिमीटर म्हणजेच 15 टक्के पाऊस झाला आहे, हा पाऊसही तुरळक भागात नोंदविला गेला आहे. त्यामुळे सर्वदूर असाच पाऊस झालेला नाही. पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाण्यातही दरवर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस नाही.

धरणनिहाय पाणीसाठा कंसात टक्केवारी पुढीलप्रमाणे
गंगापूर- 726 (13), कश्यपी- 94 (5), गौतमी-गोदावरी- 75 (4), पालखेड- 87 (13), ओझरखेड- 43 (2), दारणा- 930 (13), भावली- 180 (13), मुकणे- 170 (2), हरणबारी- 30 (3), गिरणा- 1374 (7), पुनद- 10 (1), आळंदी- 0, करंजवण- 0, वाघाड- 0, पुणेगाव- 0, तिसगाव- 0, वालदेवी- 0, कडवा- 0, भोजापूर- 0, चणकापूर- 0, केळझर- 0, नागासाक्या- 0, माणिकपुंज-0, एकूण- 3720 (6).

आपली प्रतिक्रिया द्या