
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
आतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याची कार्यवाही जिल्हास्तरावर सुरु आहे.प्रत्यक्षात रत्नागिरी तालुक्यामध्ये 11 शिक्षक कमी असताना तालुक्यातील शिक्षकांना तालुक्याबाहेर पाठवू नये या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा परिषदेच्या आवारात एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडले.
2017-18 या शैक्षणिक वर्षातील आतरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचे काम जिल्हास्तरावर सुरु झाले आहे. या शिक्षक बदल्यांना शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हापरिषदेच्या आवारात धरणे आंदोलन छेडले. या आंदोलनात आतरिक्त शिक्षक बदलीविरोधात संघटनेने आवाज उठवला. रत्नागिरी तालुक्यामध्ये सध्या 62 शिक्षक असून 11 शिक्षक कमी आहे. अशावेळी तालुक्यातील शिक्षक बाहेरच्या तालुक्यात गेल्यास शिक्षकांची कमतरता अधिक जाणवेल आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होईल. त्यामुळेच या शिक्षक समायोजन पध्दतीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेने विरोध केला.
यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष रावणंग, संतोष कंदम, सुनिल गोसावी, मेघनाथ गोसावी, जीवन सुर्वे, मनिष शिंदे, दिपक कदम, चंद्रकांत कोकरे, अजय गराटे, मंगेश मोरे, मनोज खानविलकर व इतर शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी, उपाध्यक्ष संतोष गोवळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिक्षकांनी तालुक्यामध्ये शिक्षकांची बदली झाली तर आमचा विरोध नाही. मात्र तालुक्याबाहेर एकाही शिक्षकाला पाठवू नका अशी भूमिका मांडली.




























































