
मागील पाच दिवसांपासून सुरू झालेल्या टँकर संपाचा फटका मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थिनींना बसला आहे. संपामुळे वसतिगृहाला पाणीपुरवठाच झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थिनींच्या दैनंदिन कामाचा खोळंबा होत असून विकतचे पाणी घेऊन विद्यार्थिनींना तहान भागवावी लागत आहे.
मागील कित्येक दिवसांपासून युवासेना माजी सिनेट सदस्य या वसतिगृहातील पाणी प्रश्नाचा विद्यापीठ प्रशासन आणि महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र, सध्या टँकर संपाची झळ वसतिगृहातील विद्यार्थिनींना प्रकर्षाने जाणवत आहे. विद्यार्थिनी व येथील कर्मचाऱयांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अखेर युवासेनेने पुढाकार घेतला आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर आणि शीतल शेठ देवरुखकर यांनी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह मुंबई महानगरपालिका एच पूर्व वॉर्ड येथे सहाय्यक आयुक्त क्षीरसागर यांची भेट घेऊन तत्काळ पाण्याची लाइन मिळण्याकरिता निवेदन दिले. तसेच टँकर संपकाळात वसतिगृहाला पाणीपुरवठा करण्याची मागणीदेखील केली.
युवासेनेच्या मागणीला प्रतिसाद देत महापालिकेने दहा हजार लिटर पाण्याचा टँकर वसतिगृहासाठी रवाना केला. शिवाय युवासेनेच्या वतीने दोनशे लिटर बिस्लेरी पिण्याचे पाणी विद्यार्थिनींना देण्यात आले. तसेच येथील विद्यार्थिनींशी संवाद साधून कोणतीही समस्या असल्यास युवासेनेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
वसतिगृह इमारतीला पाणी पाइपलाइनची जोडणीच नाही
कलिना पॅम्पस येथील मुलींच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 8 जुलै रोजी पार पडले. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत या इमारतीला मुंबई महापालिकेने पाण्याच्या पाइपलाइनची जोडणीच केलेली नाही. गेले सहा महिने विद्यार्थिनींना टँकरने पाणीपुरवठा होत असून मागील पाच दिवसांपासून टँकरचा संप असल्यामुळे सदर वसतिगृहातील मुली पाण्याअभावी त्रस्त झाल्या होत्या.
आज मंत्रालयात बैठक
टँकर चालकांनी संप मागे घेण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. पण मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका टँकर चालकांच्या संघटनेने घेतली आहे. यासंदर्भात उद्या,मंगळवारी सकाळी मंत्रालयात बैठक घेऊन टँकरधारकांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करू, असे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.



























































