
कॅनडाने हिंदुस्थानवर गंभीर आरोप केला असून यानंतर दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. कॅनडात लपलेल्या दहशतवादी हरदीप निज्जर याची हत्या करण्यामागे हिंदुस्थानचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टी ट्रूडो यांनी केला होता. निज्जर याच्या हत्येची चौकशी करण्यात येत असून त्याच्या हत्येमागे हिंदुस्थानचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या आरोपांचं खंडण केले असून हे सगळे प्रकार कॅनडातील वाढता खलिस्तानी दहशतवाद आणि उग्रवाद्यांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.यानंतर मंगळवारी ट्रूडो यांनी पुन्हा एकदा याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आम्ही केलेल्या आरोपाद्वारे आमचा हिंदुस्थानला चिथावणी देण्याचा प्रयत्न नाही. हिंदुस्थानने या समस्येकडे योग्य प्रकारे लक्ष द्यावे, हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे, अशी आमची इच्छा आहे, असे जस्टिन ट्रूडो यांनी मंगळवारी सांगितले. हिंदुस्थान सरकारने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आम्ही ते करत आहोत, आम्ही चिथावणी देण्याचा किंवा वाद वाढवण्याचा विचार करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. याआधी हिंदुस्थानने कॅनडा सरकारचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत फेटाळून लावले होते.
खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येमध्ये हिंदुस्थानची भूमिका असल्याच्या ट्रूडोच्या आरोपानंतर हिंदुस्थानने एका वरिष्ठ कॅनडाच्या राजनैतिक राजनयिकाची हकालपट्टी केली. या राजदूताला देश सोडण्यासाठी पाच दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. या आरोपामुळे दोन्ही देशातील राजनैतिक संबंधांना धक्का बसला आहे. त्यामुळे ट्रूडो यांनी परत मंदळवारी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.