
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा वाद सुरू असतानाच अक्कलकोट तालुक्यातील 11 गावांना गटविकास अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. सोलापूर जिल्हा प्रशासन सक्रीय झाले असून, कर्नाटकात जाण्याचा ठराव करणाऱ्या गावांना नोटिसा देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
या नोटीसांमुळे आळगी गावचे गावकरी आणि ग्रामपंचायतीचे सदस्य चांगलेच संतापले आहेत. त्यांनी आपला संताप व्यक्त करताना म्हटले की, आम्हाला नोटीस कसली देत आहात, नोटीस नको मूलभूत सुविधा द्या!
त्याचसोबत विविध पातळीवर बैठका घेऊन आमचे सरपंचपद, ग्रामपंचायत बरखास्त करू अशा धमक्या देखील दिल्या जात असल्याचं बोललं जात आहे.
अक्कलकोट तालुक्यातील 28 गावे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आहेत. येथील नागरिकांना महाराष्ट्र सरकारकडून एकही मूलभूत सुविधा मिळाली नाही अशी खंत व्यक्त करत कर्नाटक राज्यात समाविष्ट होण्याची इच्छा दर्शविली होती. आता सोलापूर जिल्हा प्रशासन किंवा महाराष्ट्र प्रशासन सीमेवरील गावांच्या ग्रामपंचायत प्रमुखांना नोटीस देण्यास सुरुवात केली आहे.






















































