
जगाच्या टेनिस साम्राज्यावर अधिराज्य गाजवणाऱया टेनिस किंग नोवाक जोकोविचपुढे सध्या ऑस्ट्रेलियात मोठी गहन समस्या उभी ठाकली आहे. कोरोना लसीकरणाचा तपशील देण्यास नकार दिल्याने ऑस्ट्रेलियन सरकारने त्याचा व्हिसा रद्द करून त्याला डिटेन्शन सुविधेत ठेवले होते. जोकोविचचा देश सर्बिया आणि जगभरातील टेनिस शौकीन या आपल्या हीरोच्या मागे ठाम उभे राहिले.आज अखेर ऑस्ट्रेलियन न्यायालयाने जोकोला दिलासा देत ऑस्ट्रेलियन सरकारने त्याचा व्हिसा रद्द करू नये आणि त्याला अन्यत्र योग्य ठिकाणी हलवावे असे निर्देश दिले.मात्र या निर्देशानंतरही ऑस्ट्रेलियन गृहमंत्र्यांनी नियम सर्वांना सारखेच. आम्ही कोरोनाबाबत धोका पत्करणार नाही.जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम आहे असे सांगत याप्रकरणी मोठा पेच उभा कायम ठेवला आहे.
नऊवेळा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकणारा सर्बियाचा नोवाक जोकोविच यंदाही आपले 10 वे जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने ऑस्ट्रेलियात आला होता, पण कोरोना संकटामुळे त्याला ऑस्ट्रेलियन इमिग्रेशन प्रशासनाने विमानतळावरच रोखले. त्याला गेले पाच दिवस कोरोना डिटेन्शन कक्षात ठेवण्यात आले होते. जोकोनेही आपण हार मानणार नाही. ऑस्ट्रेलियन प्रशासनाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार अशी भूमिका घेतली होती. अखेर न्यायालयाने आज ऑनलाइन सुनावणी घेत जोकोविचचा व्हिसा रद्द करू नये आणि त्याला अन्यत्र हलवावे असे निर्देश ऑस्ट्रेलियन सरकारला दिले. आम्ही सरकारला निर्देश देण्यापलीकडे आणखी काय करू शकतो असे मतही निकाल देणाऱया न्यायमूर्तीनी जोकोविचने वकील निक वूड त्यांच्याशी बोलताना व्यक्त केले.
आमच्या मुलाशी ऑस्ट्रेलियाचे अमानवी वर्तन!
17 जानेवारीला ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत खेळण्यापासून चॅम्पियन जोकोविचला रोखू नका या मागणीसाठी जोकोच्या सर्बियात बेलग्रेड येथे जोको समर्थकांनी मोठी रॅली काढली होती. या रॅलीत जोकोविचच्या आई आणि वडिलांनी आपल्या मुलाला ऑस्ट्रेलियन प्रशासन अमानवी वागणूक देत असल्याचा आरोप केला. नोवाकची आई म्हणाली, नोवाला ठेवण्यात आलेल्या हॉटेलात त्याला वेळेत नाश्ताही दिला जात नाही. शिवाय रूमच्या बाहेर न पडण्याचे कडक निर्बंध त्याच्यावर लावले आहेत, पण आम्ही त्याला न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरूच ठेवणार आहोत.
ऑस्ट्रेलियन सरकार व्हिसा रद्द करण्यावर ठाम
टेनिस किंग नोवाक जोकोविचने कोरोना लसीकरणाचा तपशील आम्हाला दिलेला नाही. त्यामुळे देशाच्या नियमानुसार आम्ही त्याला देशात प्रवेश न देण्याच्या भूमिकेवर ठाम आहोत असे ऑस्ट्रेलियन गृहमंत्री करेन अँड्रूय़ूज यांनी स्पष्ट केले आहे. देशाचे कायदे आणि नियमापेक्षा कुणीही मोठा नाही. आम्ही जोकोविचला अडवून ठेवलेले नाही, तो त्याच्या मर्जीने पुन्हा मायदेशी परतु शकतो. स्पर्धेसाठी आलेल्या अन्य विदेशी खेळाडूंचे व्हिसा आम्ही काटेकोरपणे तपासत आहोत, असेही अँड्रय़ूज म्हणाल्या. ऑस्ट्रेलियन मंत्र्यांना कायद्याने काही विशेषाधिकार दिलेले आहेत. त्यामुळे सरकारला निर्देश देण्याव्यतिरिक्त आपण आणखी काही करू शकत नसल्याचे ऑस्ट्रेलियन न्यायाधीशांनीही स्पष्ट केले आहे. त्यामुळे जोकोविचच्या ऑस्ट्रेलियातील प्रवेशाचे त्रांगडे अद्याप कायम असल्याचे दिसत आहे.





























































