एनपीआरनंतर एनआरसी येणारच सांगत ‘आप’ने विधानसभेत मांडला विरोधाचा प्रस्ताव

990

दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकारने शुक्रवारी दिल्ली विधानसभेत एनपीआरविरुद्धचा ठराव मंजुरीसाठी आणला. केंद्राच्या 2003 च्या सुधारित नियमांनुसार नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरचे सर्वेक्षण झाल्यावर राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर येणारच आहे असा दावा करीत ‘आप’चे मंत्री गोपाळ राय यांनी विधानसभा सभागृहात एनपीआरविरोधातील प्रस्ताव मंजुरीसाठी मांडला.

 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जरी एनपीआरसाठी कोणतीही कागदपत्रे मागणार नाही सांगत असले तरी खरा धोका पुढे आहे असे सांगत गोपाळ राय म्हणाले, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारने 2003 मध्ये नागरिकता कायद्यात काही बदल केले आहेत. त्यानुसार एनपीआर डेटा नागरिकत्वाशी जोडला गेला आणि त्यामुळे त्याच्या पडताळणीसाठी एनआरसीचा अवलंब करावाच लागला होता. गृहमंत्री अमित शहा आता म्हणत असले की, एनपीआरमध्ये डाऊटफुल (डी) शेरा असणारच नाही. पण त्यांनी 2003 चेच कायदे अमलात आणणार असेही सांगितले आहे आणि या कायद्यानुसार एनपीआर डेटासाठी एनआरसीची माहिती घेतली जाणारच हे निश्चित आहे.

माझ्याकडे जन्मदाखला नाही, मग मलाही डिटेंशन सेंटरमध्ये पाठवणार का?

केंद्र सरकारने आधी सीएए मंजूर केला. आता ते एनपीआर आणि एनआरसी आणणार आहेत. हे कायदे पाकिस्तानी हिंदूंसाठी आहेत की आपल्या देशातील हिंदूंविरोधात आहेत याचा उलघडा होत नाही, असे सांगून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, माझ्याकडे आणि मंत्रिमंडळातील काही सदस्यांकडेही जन्माचा दाखला नाहीय. मग आम्हा सर्वांना केंद्र सरकार डिटेंशन सेंटरमध्ये पाठवणार का, हा माझा अमित शहा यांना प्रश्न आहे.

एनआरसी, एनपीआर कोणत्याही धर्मांविरोधात नाहीत, पण…

एनआरसी आणि एनपीआर हे कोणत्याही धर्मांविरुद्ध नाहीत. पण आसाममध्ये याच एनआरसीचा मोठा फटका 19 लाख हिंदू आणि मुस्लिम नागरिकांना बसला. ते खरे तर या देशाचे वैध नागरिकच होते, पण कागदी घोडय़ांनी त्यांना अवैध ठरवण्याची किमया केली. हीच देशातील नागरिकांच्या मनातील मूळ भीती आहे. म्हणूनच सर्वच धर्माचे नागरिक एनआरसीला कडवा विरोध करीत आहेत. 2003 चे कायदे बदलण्याची घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी केलीय का ? असा सवाल करीत राय म्हणाले की, मग ते कोणत्या नियमाने सांगताहेत एनआरसी येणारच नाही याबाबत त्यांनी स्पष्टीकरण करावे. ‘आप’चा या दोन नोंदण्यांना विरोध आहे तो याच भीतीपोटी, असेही राय शेवटी  म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या