
एनटीसीच्या गिरण्या दोन वर्षांपासून बंद असून कामगारांचे पगार, ग्रच्यईटी थकीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सेव्ह एनटीसीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि दिल्ली एनटीसी होल्डिंग कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानुसार कामगारांची सर्व थकीत देणी तत्काळ देण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे देशभरातील एनटीसीच्या कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
देशभरात एनटीसीच्या 23 मिलमध्ये 13 हजार कामगार काम करत असून गेल्या 27 महिन्यांपासून त्यांना अर्धा पगार मिळत आहे. यामध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील सहा मिलचा समावेश आहे. थकीत देणी असतानाच कामगारांना अर्धा पगार मिळत असल्याने उपासमारीची वेळ आल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे त्यांनी थकीत देणी देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय समन्वय कृती समितीचे अध्यक्ष, आमदार सचिन अहिर यांनी याचे स्वागत करतानाच मुंबईतील बंद मिल पूर्ववत चालू करण्याची मागणी केली आहे.
या मागणीला राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराक मोहिते यांनी समर्थन दिले आहे. दरम्यान, सध्या निवृत्त होणाऱ्या कामगारांच्या ग्रॅच्युईटीची रक्कम मिळाली पाहिजे, अशी मागणी केली. एनटीसी अधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात कामगार नेते, खासदार पद्मनाभन, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे निवृत्ती देसाई, सुनील बोरकर, जी. बी. गावडे उपस्थित होते.
























































