एनटीसी मिल कामगार पीयूष गोयल यांच्या घरावर धडकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने आधी एनटीसी मिल कामगारांच्या थकीत पगारापोटीचे पैसे त्वरित द्यावेत. नाहीतर संतप्त कामगार केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या वरळी येथील निवासस्थानी जाऊन आपला रोष व्यक्त करतील, असा इशारा कामगारांनी दिला आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातील सहा एनटीसी गिरण्या 2020 पासून केंद्र सरकारने बंद केल्या आहेत. अद्याप त्या सुरू नाहीत. या कामगारांना अर्धा पगार देण्यात येत होता, पण गेल्या सहा महिन्यांपासून तोही पगार दिलेला नाही. दादर चौपाटी येथील इंडिया युनायटेड मिल क्रमांक 6 ची जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात आली आहे. त्याच्या एकूण जमिनीपैकी 50 हजार चौ.मी. जमिनीच्या टीडीआरपोटीची सुमारे 120 करोड रुपयांची रक्कम नुकतीच राज्य सरकारने एनटीसीला आदा केली आहे. तेव्हा केंद्र सरकारने आधी कामगारांच्या थकीत पगारापोटीचे पैसे त्वरित द्यावेत, अशी मागणी कामगारांनी केली आहे.