बहुगुणी ताडगोळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळा चांगलाच सुरू झाला झाला आहे. रस्त्यावरून फिरताना रस्त्याच्या कडेने बसलेले नारळासारखे दिसणारे परंतु आकाराने छोटेसे स्टार गोळे खाल्लेत का? हे फळ म्हणजेच ताडगोळे. खाल्ले नसतील तर या उन्हाळ्यात खाऊन बघा.
उन्हात फिरून तहान लागली असेल, थकवा, अशक्तपणा जाणवत असल्यास हे ताडगोळे खाल्ल्यानंतर नक्की कमी किंवा दूर होईल. ताडगोळे फक्त थकवा जाण्यासाठी नाही तर याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. ताडगोळे अतिशय मऊ आणि रसदार असतात. ताडगोळे चवीला गोड असून प्रकृतीला थंड असतात.

ताडगोळ्यांमधील घटक – खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, बी, सी हे जीवनसत्त्व आढळतात. एकंदरीतच हे फळ शरीरासाठी खूप उपयुक्त ठरतं. पाम किंवा ताडाच्या झाडाला येणारं फळ म्हणजे ताडगोळा. याचं शास्त्रीय नाव बोरासस फ्लॅबिलिफर असं आहे. हे फळ महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. ताडाच्या झाडांची लागवड समुद्रकिनारी अधिक होते. ताडगोळ्यांना बंगालमध्ये ‘ताल’, तेलुगूत ‘ताती मुंजलू’, तमिळमध्ये ‘नुग्नू’, इंग्रजीत ‘आईस ॲपल’ तर हिंदीमध्ये ‘तारी’ या नावानं ओळखलं जातं.

पौष्टिक घटक
ताडगोळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम आणि फायबरचा साठा असतो. शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्याचं काम करतं. यामुळे शरीराचं तापमानही नियंत्रणात राहतं. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रत्येकानं हे फळ आवर्जून खावं. उष्णतेमुळं होणारी पोटातील जळजळ कमी होते. उन्हामुळे लहान मुलांना आणि मोठ्यांना अनेकदा त्वचेवर पुरळ येते, अॅलर्जी होते अशावेळी ताडगोळ्यांचा रस त्वचेवर, पुरळांवर लावल्यास आराम मिळतो. अनेकांना उन्हाळी लागते अशावेळी ताडगोळे खाल्ल्यास आराम मिळतो. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. कांजिण्या आलेल्या रुग्णांनी ताडगोळे खावेत. त्यामुळं कांजण्यांनी शरीराला येणारी खाज कमी होते. शरीरातील साखरेची पातळी संतुलीत राहते. हे खाल्ल्यानं अधिक भूक लागत नाही, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवता येते.

ताडगोळे आपण फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकतो. साल न काढता फ्रीजमध्ये ठेवल्यास ताडगोळे अनेक दिवस टिकतात. उन्हाळ्यात मुलांच्या बाहेर खेळायला पाठविण्यापूर्वी हे फळ खाऊन पाठवावे. किडनीच्या आरोग्यासाठी ताडगोळे अतिशय उपयुक्त असून शरीरातील नको असलेली द्रव्ये याच्या सेवनाने शरीराबाहेर फेकली जातात.

ताडगोळ्याचे गुणधर्म
जीवाणूवाढीस प्रतिबंध, जखम भरणे, वेदनाशामक, शांत झोपेसाठी, भूक वाढू शकते, बद्धकोष्ठता दूर करू शकते, लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ , शरीर हायड्रेट राहते. उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील पाणी निघून जात असल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो. ताडगोळे हे नैसर्गिक पाणी असलेले फळ असल्याने त्याच्या जेलीसारख्या मऊ गरात भरपूर पाणी असते. ताडगोळे खाण्यामुळे तुमच्या शरीराला भरपूर पाणी मिळते. पाण्याची पातळी नियंत्रित राहिल्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान बिघडत नाही आणि तुम्ही हायड्रेट राहता. शरीर थंड राहण्यासाठी तुम्ही या ताडगोळ्याचे पाणी अथवा ताडगोळ्याचे सरबत नियमित पिऊ शकता. मधुमेही रुग्णही ताडगोळे खाऊ शकतात. हे अत्यंत कमी कॅलरी असणारे फळ आहे.

फायदे-
व्हिटॅमिन ‘ए’, ‘बी’, आणि ‘सी’, लोह, झिंक, कॅल्शिअम, फॉस्फरस, थियामाईन आणि रिबोफ्लेविनसारखे व्हिटॅमिन्स असतात.
हे सर्व मिनरल्स प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी गुणकारी ठरते. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. मधुमेहाच्या रुग्णांनी कोवळा ताडगोळा सेवन करावा. पित्त विकार आणि पोटातील जळजळ दूर होते. पचनशक्ती सुधारते. पोटात गॅस होणे, अपचन, पोटदुखी, जळजळ, बद्धकोष्ठता, मूळव्याध असे त्रास यामुळे कमी होतात.

वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ​
१०० ग्रॅम ताडगोळ्यात केवळ ४० ग्रॅम कॅलरी असते. तसंच ताडगोळा खाल्ल्याने पोट पटकन भरते. यामध्ये पाण्याचे प्रमाण असल्याने जास्त भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास फायदा मिळतो. तसेच पाणी पोटात गेल्याने त्वचाही चांगली राहाते.

नियमित सेवनाने रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे त्वचा सतत चिकट होते. ज्याचा परिणाम त्वचेवर पुरळ येणे, खाज येणे, त्वचा लालसर होणे, पिंपल्स येणे, त्वचा काळवंडणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. ताडगोळे खाण्यामुळे त्वचेला पुरेसे पोषण मिळते. पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राहिल्यामुळे घामावाटे त्वचेतील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होतो आणि तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने ग्लो करू लागते. सन टॅनपासून वाचण्यासाठी नियमित ताडगोळे खायला हवेत. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी कमी होते असल्यामुळे थकल्यासारखे वाटते. ताडगोळ्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित होऊन थकवा कमी होतो.