
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
वेलिंग्टनमध्ये झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने हिंदुस्थानचा 80 धावांनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टी-20 इतिहासामध्ये हिंदुस्थानचा हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2010 मध्ये हिंदुस्थानला 49 धावांनी पराभव सहन करावा लागला होता.
New Zealand win by 80 runs. Go 1-0 up in the three match T20I series.#NZvIND pic.twitter.com/RDet7K7uqb
— BCCI (@BCCI) February 6, 2019
न्यूझीलंडने दिलेल्या 220 धावांचा पाठलाग करताना हिदुस्थानचा संघ फक्त 139 धावांत गारद झाला. हिंदुस्थानच्या 7 फलंदाजांना तर दुहेरी आकडाही गाठता आला नाही. धोनीने सर्वाधिक 39 धावा केल्या, तर धवनने 29 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर फलंदाज फक्त हजेरी लावून माघारी परतले. न्यूझीलंडकडून टीम साऊथीने सर्वाधिक 3, फर्ग्यूसन, सँटनर आणि सोधीने प्रत्येकी 2, तर मिशेलने एक बळी घेतला.
त्याआधी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकात 6 बाद 219 धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर सिफर्ट आणि मुनरोने आठ षटकात 86 धावांची सलामी दिली. यानंतरही इतर फलंदाजांनी ही सरासरी कायम ठेवत निर्धारित षटकात धावांचा डोंगर उभारला. हिंदुस्थानचा हार्दिक पांड्याला सर्वाधिक 2 बळी मिळाले असले तरी सर्वाधिक धावाही त्यानेच दिल्या. यानंतर खलिल अहमदने 4 षटकात 48 धावा दिल्या. खलील, भुवी, चहल आणि कृणाल पांड्याला प्रत्येकी एक बळी मिळाला.
हिंदुस्थानचे टी-20 मधील सर्वात मोठे पराभव –
- 2019 न्यूझीलंडविरुद्ध 80 धावांनी पराभव
- 2010 ऑस्ट्रेलियाविरुद्ध 49 धावांनी पराभव
- 2016 न्यूझीलंडविरुद्ध 46 धावांनी पराभव
- 2017 न्यूझीलंडविरुद्ध 40 धावांनी पराभव




























































