
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सर्व राजकीय पक्षांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही सहभागी होणार आहेत. सकाळी 11 वाजता सह्याद्री गेस्ट हाऊसवर ही बैठक होणार आहे.
या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, राज ठाकरे, राजू शेट्टी यांच्यासह 27 नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिल्यानंतर यातून मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द केले आहे. महाविकास आघाडी सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे.





























































