सागरी खजाना ‘आंग्रीया बँक’ वर होणार संशोधन, राज्य शासनाचाही हिरवा कंदील

557

अमित खोत

सागरी जीवसृष्टीचा खजाना अशी ओळख असलेला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारा समुद्रातील आंग्रीया बँक प्रकल्प राबविण्याच्या हालचालींना पुन्हा एकदा गती प्राप्त झाली आहे. केंद्र सरकारच्या भूविज्ञान मंत्रालयाच्या वतीने 18 ते 28 डिसेंबर या कालावधीत आंग्रीया बँक येथे सागरी संशोधन मोहीम राबविण्यात येणार आहे.

दरम्यान, या मोहिमेत मालवण तारकर्ली येथील इसदा संस्थेचे सागरी जीव संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी, स्कूबा डायव्हिंग मास्टर नुपूर तारी, वरिष्ठ स्कूबा प्रशिक्षक जितेश वस्त यांच्यासह देशभरातील 16 शास्त्रज्ञ या मोहिमेत सहभागी होत आहेत. या मोहिमेचा अहवाल पर्यटन विकास महामंडळाला सादर केला जाणार असून महामंडळ राज्य शासनाला अंतिम अहवाल सादर करणार आहे. सागरी जैवविविधेतेचे संवर्धन करून समुद्रातील पाहिले अभयारण्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने आंग्रीया बँक या प्रकल्पाकडे लक्ष केंद्रित केले आहे. याच अनुषंगाने शासनाने आंग्रीया बँक सागरी मोहिम आखली आहे.

मोहिमेत कर्नाटक, मेंगलोर येथील वाईल्ड लाईफ कन्झरमेशन सोसायटी, महाराष्ट्र शासन कांदळवन विभाग, पर्यटन विकास महामंडळाची इस्दा संस्था, कोचीन येथील सीएमएलआरई ही अर्थविज्ञान मंत्रालय या संस्थामधील शास्त्रज्ञ सहभागी आहेत. या मोहिमेसाठी कोचीन येथून जहाज येणार आहे. आंग्रीया बँक येथील समुद्रात दहा दिवस या शास्त्रज्ञांचे वास्तव्य असणार आहे. खोल समुद्रातील जैवविविधतेचा अभ्यास होणार आहे. त्याचा फायदा भविष्यात कोकण, सिंधुदुर्गला होईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हिरवा कंदील
2008मध्ये जयंत पाटील हे अर्थमंत्री असताना अर्थसंकल्पात 5 कोटी आंग्रीया बँक येथे पर्यटन प्रकल्प सुरू करण्यासाठी तरतूद केली होती. काही कारणांमुळे हा प्रकल्प पुढे गेला नाही. मात्र आज योगायोगाने जयंत पाटील पुन्हा अर्थमंत्री आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन महामंडळ च्या पहिल्याच बैठकीत या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला. या प्रकल्पाला राज्य शासन अधिक गती प्राप्त करून देईल. अशी आशा व्यक्त केली जात आहे.

जीवशास्त्रीय, पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्व
25-35 अंश सेल्सियस तापमानात वाढणाऱ्या प्रवाळांचे जीवशास्त्रीय आणि पर्यावरणीय दृष्ट्या खूप महत्त्व आहे. उथळ पाण्यात वाढणाऱ्या ह्या जीव प्रकारांमुळे अनेक मास्यांच्या प्रजाती आणि शैवाल टिकून राहतात. सूर्यकिरण थेट पोचत असल्यामुळे प्रवाळ बेटं म्हणजे एक मोठा उत्पादक भाग तयार करतात. अन्ग्रीया बँक ही काही आज एकदम सापडलेली गोष्ट नाहीये. गेले काही दशकं झूलोजीकल सोसायटी ऑफ इंडिया आणि वन विभाग त्यावर संशोधन करत आहे. येथील जैवविविधता आणि प्रजाती आणखी सखोल अभ्यासल्या जाऊन आपल्याला हिंद महासागरात असणाऱ्या ह्या खजिन्याची आणखी सखोल माहिती मिळू शकेल.

आंग्रीया बँक एक खजाना
आंग्रीया बँक सिंधुदुर्गातील विजयदुर्ग पासून 105 की.मी. अंतरावर तर मालवण, रत्नागिरी पासून समुद्रात 110 किमी अंतरावर आहे. त्याचा उत्तर-दक्षिण विस्तार 40 की.मी. तर पूर्व पश्चिम 15 ते 20 कि.मी. आहे. समुद्र पातळीपासून 20 मी. खोल असे हे प्रवळांचे बेट आहे. विपुल सागरी जैवविविधता 700 च्यावर मत्स्य प्रजाती, 350 च्यावर प्रवाळ, यासह व्हेल शार्क, व्हेल (देवमासा) आदी महाकाय माशांसाठी हे प्रवाळ बेट आश्रयस्थान मानले जाते.

आपली प्रतिक्रिया द्या