
डिजिटल इंडियाचा देशभरात गवगवा असून केंद्र सरकार यासाठी आग्रही आहे. मात्र आजही ग्रामिण भागामध्ये डिजिटल इंडियाचे वारे पोहचलेले नाही. याचाच प्रत्यय येणारा एक व्हिडीओ ओडिशातून समोर आला असून यामुळे डिजिटल इंडियाच्या दाव्यांचे पितळ उघडे पडले आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आहेत.
व्हायरल होणारा व्हिडीओ ओडिशातील नबरंगपूर (Nabarangpur) जिल्ह्यातील बनुआगुडा गावातील असून या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलेचे नाव सूर्या हरिजन (Surya Harijan) आहे. महिलेचे वय 70 असून हक्काची पेन्शन मिळवण्यासाठी तिला रखरखत्या उन्हामध्ये खूर्चीचा आधार घेऊन अनेक किलोमीटर अनवाणी चालावे लागत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
ओडिशामध्ये सध्या उन्हाचा पारा वाढला आहे. तापमान 40 अंशांवर गेले असून उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवत आहे. अशा परिस्थितीमध्ये एका वृद्ध महिलेला हक्काची पेन्शन मिळवण्यासाठी उन्हामध्ये अनवाणी चालावे लागत आहे. वयोमानानुसार महिलेचे शरीर थकले असून त्यामुळे ती खुर्चीचा आधार घेऊन चालताना व्हिडीओत दिसत आहे.
#WATCH | A senior citizen, Surya Harijan walks many kilometers barefoot with the support of a broken chair to reach a bank to collect her pension in Odisha’s Jharigaon
SBI manager Jharigaon branch says, “Her fingers are broken, so she is facing trouble withdrawing money. We’ll… pic.twitter.com/Hf9exSd0F0
— ANI (@ANI) April 20, 2023
सूर्या हरिजन या महिलेचा मुलगा स्थलांतरित मजूर म्हणून करतो. तो सध्या दुसऱ्या राज्यात कामाला गेला असून वृद्ध महिला तिच्या नातवंडांसह एका झोपडीत राहते. महिलेच्या हाताची बोटं तुटलेली असून यामुळे पैसे काढण्यास व्यत्यय येत आहे. तसेच तिच्या पायालाही दुखापत झालेली असल्याने गेल्या चार महिन्यांपासून ती पेन्शन घेण्यासाठीही बँकेत गेली नव्हती. मात्र पैशाची निकड पाहता तिने रखरखत्या उन्हात अनवाणी चालत जाण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे म्हटले. महिलेला आता अशाप्रकारे बँकेत येण्याची गर नाही. यावर बँक लवकरच काही ना काही मार्ग काढेल, असेही बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
























































