
सामना प्रतिनिधी । लातूर
96 हजार 417 रुपयांची शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी लातूर जिल्हा परिषदेचे लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता एस एस हाश्मी आणि उपअभियंता सी एन साळुंखे यांच्याविरुद्ध जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळकोट तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील पाजर तलाव क्रमांक 3 च्या सांडव्याच्या कामात कमी बांधकाम करून जास्त काम केल्याचे बिल नोंदवण्यात आले. चेअरमन मजूर सहकारी संस्था उदगीर यांना 1 लाख 97 हजार 332 रुपये अदा करण्यात आले. या कामासंदर्भात तक्रार करण्यात आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी एक चौकशी समिती नेमली. चौकशी अहवालामध्ये 96 हजार 417 रुपये आगाऊ देऊन शासनाची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले. कार्यकारी अभियंत्यांनी यासंदर्भात जळकोट पोलीस ठाण्यात तक्रार पाठवून दिली त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
































































