
एसटी कर्मचाऱयांच्या विलीनीकरणाच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. बुधवारी सकाळी पुन्हा एकदा बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे संपावर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटीचे प्रतिनिधी यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात मंगळवारी सायंकाळी बैठक झाली. सुमारे दोन तास ही बैठक चालली. त्यानंतर परिवहनमंत्री अॅड. अनिल परब प्रसारमाध्यमांशी बोलले. ते म्हणाले की, हायकोर्टाने विलीनीकरणाचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली आहे. समितीचा जो काही अहवाल येईल तो आम्ही मान्य करू, पण तोपर्यंत संप चालू राहू देणे परवडणारे नाही. शिष्टमंडळाशी चर्चा सकारात्मक झाली असून कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय दिला आहे. आम्ही ऑफर दिली असून उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा बसून चर्चा करू असे परब यांनी सांगितले.
दोन–तीन पर्याय दिले
आम्ही पैशाची ऑफर दिली नाही. संघटनेला दोन-तीन पर्याय दिले आहेत. अंतरिम वेतनवाढ देऊ शकतो. वाढ दिल्यानंतर समितीने एसटीच्या विलीनीकरणाचा निर्णय दिला तर विलीनीकरणानंतरही पगारवाढ दिली जाईल, असे अॅड. परब यांनी सांगितले.
दोन पावले मागे घ्या
कामगारांनी अधिक ताणू नये. सरकार दोन पावले पुढे यायला तयार आहे. तुम्ही दोन पावले मागे या. चर्चेने मार्ग काढू असे सांगतानाच कामगारांनी संप मागे घ्यावा, असे आवाहनही अॅड. परब यांनी या वेळी केले.






























































