…तरीही महाराष्ट्रासाठी ऑलिम्पिक मृगजळच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 विठ्ठल देवकाते 

गुजरातमधील 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे गुरुवारी सूप वाजले. 29 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबरदरम्यान रंगलेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 39 सुवर्ण, 38 रौप्य व 63 कांस्य अशी एकूण 140 पदकांची लयलूट केली. पदक तक्त्यात महाराष्ट्राने सेनादलानंतर दुसरे स्थान मिळविले, मात्र तरीही महाराष्ट्राच्या खेळाडूंसाठी ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे मृगजळच होय, अशी परिस्थिती आहे. कारण राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्यांपैकी महाराष्ट्राचा अमूक खेळाडू ऑलिम्पिकचे तिकीट बुक करू शकतो, असे आपण छातीठोकपणे सांगू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ऑलिम्पिक पदकाची आशा करणे तर दूरची गोष्ट आहे. देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधवांचा वारसदार या मातीत कधी घडणार? हीच महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राची खरी खंत होय.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे आठ खेळाडू पात्र ठरले होते. यातील सहा ऑलिम्पिकमध्ये, तर दोन पॅरा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते. यात तेजस्विनी सावंत (50 मीटर रायफल थ्री पोजिशन), राही सरनोबत (50 मीटर पिस्तूल), अविनाश साबळे (स्टीपलचेस), प्रवीण जाधव (तिरंदाजी), चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन दुहेरी), विष्णू सरवानन (सेलिंग) हे ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते.

जलतरणातील सुवर्णकाळ संपला!

पूर्वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत डायव्हिंग आणि वॉटरपोलो सोडून महाराष्ट्राचे जलतरणपटू 40 हून अधिक पदकांची लयलूट करायचे. यात 20 च्या आसपास सुवर्ण पदके असायची. राष्ट्रीय स्पर्धेत कर्नाटक व महाराष्ट्राच्या जलतरणपटूंमध्ये जुगलबंदी रंगायची. कर्नाटकने जलतरणामधील आपला दर्जा टिकवून ठेवलाय, मात्र या खेळातील मक्तेदारी आता संपुष्टात आली आहे. डायव्हिंग व वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्राच्या संघात रेल्वेतील खेळाडू होते, म्हणून आपल्याला 5 सुवर्ण, 5 रौप्य व 12 कांस्य अशी एकूण 22 पदके मिळाली. डायव्हिंग व वॉटरपोलो वजा केल्यास महाराष्ट्र दहाव्या स्थानी आहे. केरळ, सेनादल, गुजरात, मध्य प्रदेश, आसाम ही राज्येदेखील जलतरणात महाराष्ट्राच्या पुढे गेली आहेत. आता महाराष्ट्रात राज्य ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी 20 कोटी रुपयांचे बजेट आहे. तब्बल 28 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या वर्षीही मिनी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतून तरी ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू देशाला मिळतील, अशी अपेक्षा करूया.

बिगरऑलिम्पिक खेळात वर्चस्व

यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेत नव्याने समावेश झालेल्या मल्लखांब, स्केटिंग व योगासन या खेळात महाराष्ट्राने 16 सुवर्ण, 15 रौप्य व 7 कांस्य अशी एकूण 38 पदकांची लयलूट केली. त्यामुळेच महाराष्ट्राला पदक तक्त्यात दुसरे स्थान काबीज करता आले. मात्र, हे तीनही खेळ ऑलिम्पिकमध्ये नाहीत. बॉक्सिंग, कुस्ती, वेटलिफ्टिंग व नेमबाजी या ऑलिम्पिक खेळामध्ये महाराष्ट्राची पीछेहाट होत आहे. मात्र, एकेकाळी कुस्तीत दबदबा असलेल्या महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेत एकही सुवर्ण पदक मिळाले नाही. एक रौप्य व चार कांस्य पदकांवरच महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंची बोळवण झाली. नरसिंग यादव व राहुल आवारे हे मराठमोळे कुस्तीपटू ऑलिम्पिक पदकाचे दावेदार होते. मात्र, आता कुस्ती खेळातही महाराष्ट्राची पीछेहाट झाली आहे.