आजच्या काळातील रावण असाच दिसतो, दिग्दर्शक ओम राऊत यांनी दिला सैफला पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीझर प्रदर्शित झाल्यापासून बहुचर्चित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाभोवती वादाचे ग्रहण लागले आहे. चित्रपटात रावणाची भूमिका साकारणाऱया अभिनेता सैफ अली खान याचा लूक पाहून तो रावण कमी आणि तालिबानी किंवा खिलजी अधिक वाटत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून मिळतायत. याप्रकरणी काही संघटना आक्रमक झाल्या आहेत. परंतु आजच्या काळातील रावण असाच दिसतो, असे म्हणत ‘आदिपुरुष’चा दिग्दर्शक ओम राऊत हा अभिनेता सैफच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे.

दिग्दर्शक ओम राऊत म्हणाला, ‘आदिपुरुष’मधला रावण हा आजच्या काळातील रावण आहे तो असाच दिसणार. या चित्रपटातील रावण क्रूर आहे. हा चित्रपट आमच्यासाठी एक मिशन असून आम्ही भक्तीने हा चित्रपट बनवला आहे. त्यासाठी प्रेक्षकांचे आशीर्वाद हवे आहेत. सध्या तरी मी सगळय़ांचे म्हणणे ऐकून घेतो, पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा कुणीच निराश होणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे. ‘तान्हाजी’ या चित्रपटाला मिळालेल्या तुफान यशानंतर ‘आदिपुरुष’ हा दिग्दर्शक ओम राऊत याचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान, देवदत्त नागे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 12 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.