
सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी विरोधकांनी पुरावे मागितले, परंतु यावेळी कुणीही पुरावे मागू नयेत म्हणून थेट ऑन कॅमेरा ऑपरेशन सिंदूर केले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले आहे. गांधीनगर येथील कार्यक्रमात ते बोलत होते. आता विरोधकांना पुरावे द्यावे लागणार नाहीत. कारण देवच पुरावे देत आहे, असेही ते म्हणाले.
आपण अजून फारसे काही केले नाही, परंतु त्यांना आताच घाम फुटला आहे. सध्या आम्ही आमची धरणे स्वच्छ करत आहोत, पण तिकडे पूर येत आहे. आमचे कुणाशीही वैर नाही. परंतु शरीर कितीही निरोगी असले तरी एक काटा सतत वेदना देऊ शकतो. त्यामुळे हा काटाच काढून टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असेही मोदी म्हणाले.
6 मेच्या रात्री मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या मृतदेहांना पाकिस्तानी सैन्याने सलामी दिली. यावरून दहशतवादी कारवाया हे काही प्रॉक्सी वॉर नाही तर पाकिस्तानची विचारपूर्वक केलेली युद्धनीती आहे. आता तुम्हाला तसेच उत्तर मिळेल, असा इशाराही मोदींनी पाकिस्तानला दिला.
सरदार पटेलांचा सल्ला मानला असता तर आजची वेळ आली नसती
फाळणीनंतर कश्मीरवर पहिला हल्ला झाला होता तेव्हाच जर सरदार पटेलांचा सल्ला ऐकून दहशतवाद्यांना संपवले असते तर आज ही वेळ आलीच नसती, पहलगाम घडले नसते आणि 75 वर्षांचे दुःख टाळता आले असते, असे मोदी म्हणाले. पाकिस्तानने मुजाहिद्दीनच्या नावाखाली भारतमातेचा एक भाग काबीज केला. तेव्हाच सरदार पटेलांचा सल्ला मान्य केला असता तर आजची वेळ आली नसती, असे ते म्हणाले.