इन्स्टाग्रामवर अल्पवयीन मुलींना त्रास देणारा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

इन्स्टाग्रामवर मॉर्फ (बदल केलेले) फोटो टाकण्याची धमकी अल्पवयीन मुलींना त्रास देणाऱ्याला वाकोला पोलिसांनी अटक केली. जनम प्रदीप पोरवाल असे त्याचे नाव आहे. तो स्पूफिंग कॉलवरून मुलींना त्रास देत असल्याचे तपासात उघड झाले.

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दोन महाविद्यालयीन मुलींनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परिमंडळ- 8 चे उपायुक्त अनिल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक कैलास आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक देविदास अरण्ये यांनी तपास सुरू केला. पोलिसांकडे तशी फारशी माहिती नव्हती. गेल्या दीड महिन्यापासून पोलिसांनी तांत्रिक माहितीचा अभ्यास केला. मुलींना आलेले फोन हे परदेशातून आले असावे असे पोलिसांना वाटले होते.

फोन करणारा हा त्याचा चेहरा दिसू नये याची खबरदारी घ्यायचा. स्पूफिंगद्वारे फोन करणाऱ्या व्यक्तीचा खूप अभ्यास असावा असे पोलिसांना वाटले होते. त्याची पोलिसांनी तांत्रिक माहिती काढली. वाकोला पोलीस त्याचा गेल्या दीड महिन्यापासून शोध घेत होते. अखेर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक अहमदाबादला पोहचले. तेथून पोलिसांनी जनमला ताब्यात घेतले. जनम हा इन्स्टाग्रामवर असलेल्या मुलीचे फोटो मॉर्फ करायचा. मजेकरता व्हिडीओ कॉलवर संवाद साधला नाही तर फोटो सोशल मीडियावर अपलोड करू, अशी तो धमकी देत असायचा. जनम हा अहमदाबादच्या कानपूर येथील रहिवासी आहे. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तो अशा प्रकारची कृत्ये करत होता असे तपासात उघड झाले आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी एक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला आहे.

काय आहे स्पूफिंग कॉल
स्पूफिंग कॉलच्या माध्यमातून नेमका कोठून फोन आला हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे नेमका फोन करणारा व्यक्ती त्याची तांत्रिक माहिती मिळणे अवघड असते. बनावट नावाने आयडीच्या माध्यमातून सहज कॉल करता येतात.