
सामना प्रतिनिधी । जळकोट
लातूर जिल्ह्यातील जळकोट येथील आणखी एक जवान शहीद झाला आहे. रोहीत उत्तम शिंगाडे वय २९ हा सियाचीन ग्लेसीयर (जम्मु काश्मीर) येथे कर्तव्यावर असतांना बर्फावरून घसरून त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते.
जळकोट शहरातील रोहीत शिंगाडे हा सन २००७ रोजी मिलट्रीत लान्स नाईक म्हणून (सेव्हन महार रेजिमेंट बटालीयन) मध्ये काम करत होता. सियाचीन भागात उंच टेकडीवर मोठ्या प्रमाणात बर्फ होते. बर्फावरून घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. तेथून त्यांना विमानाने उपचारासाठी दिल्ली येथे आणण्यात आले होते. रोहीत वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद देत नव्हता. ता.१३ रोजी चार वाजता उपचारादरम्यान त्याने प्राण सोडले.
रोहीतच्या पश्चात वडील, पत्नी, सहा बहिणी, दोन भाऊ, मुलगा असा परिवार आहे. सदरील पार्थिव दिल्लीहून विमानाने हैद्राबाद येथे आणण्यात येणार असून हैद्राबाद येथून दि..१५ रोजी जळकोट येथे येणार आहे.




























































