
सामना प्रतिनिधी । लातूर
मोजणी केलेल्या जमिनीच्या नकाशाची नक्कल देण्यासाठी 500 रुपयांची लाच स्वीकारताना भूमापक माणिक अण्णासाहेब वाघमारे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. निलंगा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलंगा तालुक्यातील मौजे चन्नाचि वाडी येथील गट क्रमांक 9 मध्ये 17 जानेवारी 2019 रोजी करण्यात आलेल्या जमिनीच्या नकाशाची नक्कल देण्यासाठी निलंगा येथील उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयातील भूमापक माणिक अण्णासाहेब वाघमारे यांनी तक्रारदारास एक हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर पाचशे रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पकडले. निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपाधीक्षक माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचला.































































