
महाभयंकर अशा ‘तौकते’ चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या ओएनजीसीच्या बेपत्ता 22 कर्मचाऱयांना शोधण्याचे काम नौदलाकडून सलग पाचव्या दिवशीही सुरूच आहे. मुसळधार पाऊस आणि 120 किलोमीटरपेक्षा जोराने वाहणाऱया वादळी वाऱयामुळे दुर्घटनास्थळावर हे कर्मचारी शेकडो किलोमीटर दूर वाहत गेले असावेत, अशी शक्यता गृहीत धरून ही शोधमोहीम राबवली जात आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 188 जणांना वाचवण्यात यश आले असून आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 31 जणांचे मृतदेह पोलिसांकडे सोपवण्यात आले असून इतरांचे मृतदेह सोपवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टय़ामुळे तयार झालेल्या ‘तौकते’ चक्रीवादळामुळे सोमवारी संध्याकाळी 5 वाजता ओएनजीसी कंपनीचा ‘पी-305’ हा बार्ज समुद्रात बुडाला. मुंबईपासून 175 सागरी मैलावर असलेल्या हिरा ऑईल फिल्ड या ठिकाणी तेल उत्खननासाठी गेलेल्या या बार्जवरील 261 कर्मचारी यावेळी समुद्रात बुडाले. मात्र लाईफ जॅकेट असल्यामुळे यातील कर्मचारी समुद्रात हेलकावे खात तब्बल 11 तास जीवन-मृत्यूशी झुंज देत होते. रात्री उशिरा चक्रीवादळातही नौदलाने अचाट कामगिरी करत बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत या बचावकार्यात 5 युद्धनौकांसह 3 टोही विमाने सहभागी असून आज पाचव्या दिवशी ही शोधमोहीम सुरू होती.
बार्जच्या कॅप्टनविरोधात गुन्हा दाखल
‘पी-305’ बार्जचे इंजिनीअर रेहमान यांच्या तक्रारीवरून आज कुलाबा येथील यलो गेट पोलीस ठाण्यात बार्जच्या कॅप्टनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बार्जवरील इतर कर्मचाऱयांच्या जीविताला धोका निर्माण होईल हे माहीत असतानाही धोकादायक समुद्रातच थांबणे, निष्काळजीपणा आणि इतर कारणांअंतर्गत कॅप्टनवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, ज्या अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमार्फत बार्जवर काम सुरू होते त्या कंपनीनेही बार्जच्या कॅप्टनला वादळाची कल्पना दिल्यानंतर कॅप्टनने बार्जवरील कर्मचाऱयांना मुंबईत सुरक्षितपणे न आणता तो समुद्रात बार्जवरच थांबला. कंपनीच्या सूचनांचे पालन केले नाही, असे स्पष्ट केले आहे.
मृतांच्या नातेवाईकांना 35 ते 75 लाख मिळणार
दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 35 ते 75 लाख नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी माहिती बुडालेल्या पी-305 या बार्जची मालकी असलेल्या अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने केली आहे. मृत कर्मचाऱयांपैकी ज्या कर्मचाऱयांची सेवेतील 10 वर्षांपर्यंतची सेवा बाकी असेल त्या शिल्लक पगारासह विशेष आर्थिक पॅकेज आणि विम्याचे पैसे असे मिळून प्रत्येक कर्मचाऱयाला 35 ते 75 लाख दिले जाणार आहेत, असे अॅफकॉन्सच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान, ओएनजीसी व्यवस्थापनाकडून आज दुर्घटनेतील जखमींना 1 लाख तर बेपत्ता आणि मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. तसेच ओएनजीसीने हेल्पडेस्क तयार केला असून त्याद्वारे अद्ययावत माहिती दिली जात आहे.
लाईफ जॅकेटवरील रेडिएशन सांगणार ठावठिकाणा
नौदलाने आजपासून शोधमोहिमेची कक्षा वाढवली असून ही दुर्घटना घडलेल्या 175 सागरी मैलाच्या परिसरावरून आता 650 सागरी मैलापर्यंत ही शोधमोहीम राबवली जाणार आहे. वाऱयाच्या भयंकर वेगामुळे घटनास्थळापासून कर्मचारी वेगवेगळ्या दिशेने शेकडो किलोमीटर दूरपर्यंत वाहत गेल्याची शक्यता गृहीत धरून आता मोहिमेची कक्षा वाढवण्यात आली आहे. या शोधमोहिमेत कर्मचाऱयांनी घातलेले लाईफ जॅकेट त्यांचा ठावठिकाणा शोधण्यात मदत करणार आहे. जॅकेट्स पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर यावर असलेल्या रेडिएशनमुळे ती अधिक उजळून निघतात. त्यामुळे समुद्रात अशा चकाकत्या प्रकाशाचा शोध घेत कर्मचाऱयांना वाचवणे अधिक सोपे होणार आहे.


























































