
कांद्याचा प्रश्न बिकट झाल्यानंतर शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप सुरू झाला आहे. आज तर कोपरगाव मध्ये भारत रथाच्या माध्यमातून भाजपाचा प्रचार सुरू असतानाच शेतकऱ्यांनी त्या रथाला अडवून त्याच्यासमोर कांदे फेकून भाजपचा निषेध केला. या रथाला गावात फिरू न देता परत पाठवण्यात आला. ही घटना कोपरगाव तालुक्यामध्ये
कांद्याचा विषय सर्वत्र आता पेटला आहे निर्यात बंदी नंतर आता पुन्हा कांद्याचा भावाचा प्रश्न हा उपस्थित झालेला आहे. त्यातच अनेक शेतकऱ्यांनी या संदर्भामध्ये आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे तर दुसरीकडे केंद्र सरकारने शेतकरी घेतलेल्या विरोधी निर्णयामुळे शेतकरी वर्ग आक्रमक झालेला आहे.
केंद्रातील मोदी सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती जनतेला देण्यासाठी शासनाच्या वतीने विकसित भारत रथाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन स्क्रीनवर विविध विकासकामांची माहिती दिली जात आहे. नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील शेतकऱ्यांनी या संकल्प रथापुढे कांदे ओतून सरकारचा निषेध नोंदवत या रथाला माघारी पाठवलं आहे.
नुकतेच केंद्र शासनाने कांद्यावर निर्यात शुल्क लावलं होत त्याचबरोबर मोदी सरकारचे शेतकरी विरोधी धोरण असल्याचे आरोप करत शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या कामाची माहिती देणाऱ्या या रथाला गावात एंट्री करण्यास विरोध केला आहे. उद्योगपती तुपाशी शेतकरी उपाशी, केंद्र शासनाचं धोरण शेतकऱ्यांचं मरण अशा प्रकारच्या घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या.
मोदी सरकार येऊन आज दहा वर्षाचा कालावधी होत असून मोदी सरकारने या बळीराजाला इतका मारणी घातलं की, २१ वेळेस कांद्याच्या भावाला मोदी व बीजेपी सरकार आडवे झालेले आहे. कांद्यावर निर्यात शुल्क लावून निर्यात बंदी करुन वेळोवेळी असे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी भरपूर काही करतो असे फक्त दाखवण्याचे कार्य या सरकारचे असून “बात्र्याच्या शेतात 12 अवतं अन् पाहायला गेलो तर एकही नव्हतं” अशी गत या सरकारची असल्याची टीका नाटेगाव येथील शेतकरी एकनाथ फापाळे यांनी केली आहे.
सरकारी कर्मचऱ्यांचा वापर कशाला
शासकीय कोणत्याही कर्मचाऱ्याला तुम्ही मोदींच्या प्रचाराला उतरवू नका कारण ते पगार आमच्या पैशातून घेत आहे. तुम्ही तुमच्या प्रचारासाठी खासगी माणसं नेमा, सरकारी कर्मचाऱ्यांना या कामात अडकवण्याची गरज नाही, शासकीय काम थांबून तुम्ही त्यांना असे काम करण्यास सांगत आहे हे योग्य नसल्याचे शेतकरी प्रभाकर मोरे यांनी म्हटले आहे.
विकसित भारत रथाला भाजप कार्यकर्त्याचा विरोध
सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सरकार चांगले निर्णय घेत असून शेतकऱ्यांच्या बाबतीत या सरकारचे निर्णय चुकीचे आहे असा आमचा सर्व शेतकऱ्यांचा समज आहे, अचानक कांदा निर्यात बंदी करण असे निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने चुकीचे वाटतात. मी भाजपचा कार्यकर्ता आहे परंतु आज शेतकऱ्यांनी संकल्प रथाला जे विरोध करत कांदा ओतला, मी यांच्यासोबत असून यांच्या या आंदोलनाला माझा पाठिंबा असल्याचे भाजप कार्यकर्ते तथा शेतकरी गोरक्षनाथ मोरे यांनी म्हटले आहे.



























































