ऑनलाईन अभ्यासात अडचणी येत असल्याची बहुसंख्य विद्यार्थ्यांची तक्रार

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला तेव्हापासून देशभरातील शाळा-कॉलेजेस बंद करण्यात आली आहे. अनलॉकचे विविध टप्पे जाहीर करण्यात आले असले तरी अजूनही शाळा आणि कॉलेज सुरू करण्यात आलेली नाहीत. लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे शाळा सुरू करण्याची घाई केली जात नाहीये. कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळांनी ऑनलाईन पद्धत अवलंबली आहे. गोदरेज इंटिरिओने यासंदर्भात एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात 62 टक्के मुलांना ऑनलाईन अभ्यास करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे.

‘गोदरेज इंटिरिओ’शिक्षणाच्या जागांबाबत फेरविचार करायला लावणारी श्वेतपत्रिका प्रकाशित केली आहे. यासाठी त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानात सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात 3 ते 15 वर्ष वयोगटातील 350 पेक्षा जास्त शालेय मुलांच्या पालकांचा समावेश करण्यात आला होता. याशिवाय विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने शिक्षण देताना जागेमध्ये भविष्यात कसे बदल करावे लागतील, याविषयी शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडूनही प्रतिसाद मागवण्यात आले होते. त्यांचाही या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला आहे. या सर्वेक्षणातून 78 टक्के मुलांनी ऑनलाइन शिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले आहे. घरी राहून शिकता येत असल्याने ही मुले खूष असल्याने सर्वेक्षणात म्हटले आहे.

सर्वेक्षणातील ठळक बाबी

 • 75 टक्के मुले ऑनलाइन वर्गातील शिक्षकांशी अधिक संवाद साधतात.
 • ऑनलाइन शिक्षणात अभ्यासातील विविध संकल्पना चांगल्या प्रकारे समजून घेता येत असल्याचे 85 टक्के मुलांनी म्हटले आहे.
 • विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडीत ठेवण्यास मदत झाली आहे.
 • 50 टक्के विद्यार्थ्यांनी भावंडांमुळे किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींमुळे विचलित होत असल्याची तक्रार केली आहे
 • घरातील संभाषणांमुळे आणि इतर काही घडामोडींमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो
 • विद्यार्थी अभ्यासापेक्षा घरातील घडामोडींमध्ये जास्त रस घेतात
 • ऑनलाईन अभ्यास करताना 62 टक्के विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्या
 • 14 टक्के मुलांना जमिनीवर बसून अभ्यास करणे पसंत आहे

शाळा कधीतरी सुरू कराव्याच लागणार आहेत. जेव्हा त्या सुरू करण्यात येतील तेव्हा विद्यार्थी शिकत असलेल्या जागेमध्ये भविष्यात काही फेररचना कराव्या लागतील असे ‘गोदरेज इंटिरिओ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल माथूर यांनी म्हटलंय. यासाठीचे उपायही श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आले असून ते खालीलप्रमाणे आहेत.

शाळेमध्ये एकाच वेळी विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये, म्हणून एक दिवसाआड वर्ग असे वेळापत्रक तयार करावे लागेल. ज्या दिवशी विद्यार्थी शाळेत येणार नसेल त्या दिवशी तो व्हर्च्युअल पद्धतीने वर्गात सामील होईल याची काळजी घेतली पाहिजे

श्वेतपत्रिकेतील महत्वाच्या शिफारसी

 • वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या 25 पेक्षा अधिक नसावी
 • दोन विद्यार्थ्यांमध्ये 6 फुटांचे अंतर असावे आणि एका बाकावर एकच विद्यार्थी असावा
 • बाकांना आणि वर्गातील इतर फर्निचरना चाके असतील तर त्यांची हालचाल करणे सोपे होईल
 • शाळेतील कमी वापराच्या जागांचाही (ग्रंथालय, क्रीडा वर्ग, संगणक कक्ष आणि समुदाय कक्ष) वर्ग म्हणून वापर करावा, या जागा विलगीकरण कक्षामध्येही रुपांतरीत करता येतील.
 • डेस्क बंदिस्त असावेत आणि खुर्च्यांवर आवरणे असावीत, ही आवरणे रोज निर्जंतूक करता येतील असी हवीत
 • कॅफेटेरिया आणि कॅन्टीनमध्ये टेबलांच्या दोन रांगांमध्ये प्लॅस्टीक गार्ड किंवा पडदे लावावेत
 • ‘स्टाफ रूम’मध्ये दोन शिक्षकांच्या बसण्याच्या जागेमधील पार्टिशनची उंची वाढवावी
आपली प्रतिक्रिया द्या