
महानिर्मितीमध्ये तंत्रज्ञ-3ची 746 पदे रिक्त आहेत, ती भरण्यासाठी सोमवार 16 डिसेंबरपासून ऑनलाइन परीक्षा होणार आहे. याआधी जून महिन्यात परीक्षा होणार असे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र अचानक तांत्रिक कारण देत परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. त्यामुळे उमेदारांचा जीव टांगणीला लागला होता. त्यांना आता दिलासा मिळणार आहे.
कोळशावरील औष्णिक वीज प्रकल्प आणि जलविद्युत प्रकल्पात मोठय़ा प्रमाणात तंत्रज्ञ काम करतात. त्यापैकी 746 पदे रिक्त झाल्याने ती सरळ सेवा प्रवेशाद्वारे भरण्यासाठी मानवसंसाधन विभागाने जाहिरात देत जूनमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्याचे निश्चित केले होते. परंतु निवडणुकांमुळे सदर परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. त्याचे आता नव्याने वेळापत्रक जाहीर झाले असून 16 ते 18 डिसेंबर या तीन दिवसांत ऑनलाइन परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र मिळवण्यासाठी महानिर्मितीच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार संबंधितांनी ते काढून घ्यावे, असे आवाहन महानिर्मितीने केले आहे.




























































