
विद्यार्थ्यांमध्ये मूल्य शिक्षण आणि मूल्याधारित शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्दिष्टाने मुंबई विद्यापीठात 8 ते 14 फेब्रुवारीदरम्यान ऑनलाइन इंडक्शन प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात दुपारी 3.30 ते संध्याकाळी 6.45 वाजेपर्यंत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र आणि व्यवस्थापन शाखेतील 8,438 एवढय़ा विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये संभाजीनगर, पुणे, बुलढाणा, कोल्हापूर, जळगाव आणि नाशिक येथील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता प्रा. अनुराधा मजुमदार आणि सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य सुरेश उकरंडे यांनी याकामी पुढाकार घेतला असून AICTE NCCIP यांचे यासाठी सहकार्य लाभले आहे. AICTE NCCIP चे उमेश जाधव आणि डॉ. मोहन राव व विद्यापीठातील इतर तज्ज्ञ व्यक्ती या इंडक्शन प्रोग्रॅममध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.




























































